फक्त अ‍ॅप इन्स्टॉल केले अन् ७ लाख गायब!

अ‍ॅप डाऊनलोड होताच सायबर भामट्यांनी अवघ्या ६० मिनिटांत केले ९ व्यवहार; पोलिसांनी सुरू केला तांत्रिक तपास.
Fake Bank of India app fraud in Kalyan Bazarpeth police complaint
प्ले स्टोअरवरील 'फेक अ‍ॅप'चा नवा थरार; कल्याणच्या ग्राहकाला ६ लाख ९७ हजारांचा फटका
Published on

कल्याण: स्मार्टफोनच्या युगात ऑनलाईन बँकिंग व्यवहार सोपे झाले असले, तरी दुसरीकडे सायबर गुन्हेगारांचे जाळे अधिकच गडद होत असल्याचे समोर येत आहे. बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी बँक ऑफ इंडियाचे बनावट अ‍ॅप डाऊनलोड करणे कल्याणमधील एका ज्येष्ठ नागरिकाला महागात पडले आहे. या बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी अवघ्या एका तासात ९ वेगळ्या व्यवहारांद्वारे ६ लाख ९७ हजार रुपये परस्पर भामट्यांच्या खात्यात वळते करून गंडा घातला आहे. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा भागातील एका गृहसंकुलात राहणारे मोहन पिसे एका वकिलाच्या कार्यालयात अपघात विम्याची कामे करतात. त्यांचे कल्याणमधील बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. गेल्या आठवड्यात मोहन पिसे यांना आपल्या खात्यात किती शिल्लक रक्कम (Balance) आहे हे तपासायचे होते. बँकेत जाण्याचा फेरा वाचवण्यासाठी त्यांनी मोबाईलवर बँकेचे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा निर्णय घेतला.

Fake Bank of India app fraud in Kalyan Bazarpeth police complaint
कमिशनचे आमिष अन् बँक खाते भाड्याने! एका चेकने उघड केले सायबर रॅकेट

'प्ले स्टोअर'वरील बनावट अ‍ॅपचा फटका

मोहन पिसे यांनी मोबाईलमधील 'प्ले स्टोअर'वर जाऊन बँक ऑफ इंडियाचा लोगो असलेले आणि 'BOI मोबाईल' असा उल्लेख असलेले अ‍ॅप सर्च करून डाऊनलोड केले. मात्र, हे अ‍ॅप बँकेचे अधिकृत अ‍ॅप नसून सायबर गुन्हेगारांनी तयार केलेले बनावट (Fake App) अ‍ॅप होते. अ‍ॅप डाऊनलोड होताच पिसे यांनी कोणताही व्यवहार केला नसतानाही, सायबर भामट्यांनी त्यांच्या खात्यावर दरोडा टाकला.

एका तासात ९ व्यवहार; लाखो रुपये लंपास

अ‍ॅप इन्स्टॉल झाल्यानंतर अवघ्या एका तासाच्या कालावधीत मोहन पिसे यांच्या खात्यातून:

  • १ लाख ९५ हजार रुपये

  • ९५ हजार रुपये

  • ५३ हजार रुपये

  • २५ हजार रुपये

याप्रमाणे तब्बल नऊ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण ६ लाख ९७ हजार रुपये अज्ञात भामट्याच्या खात्यात ट्रान्सफर झाले. खात्यातून पैसे कपात झाल्याचे मेसेज येताच पिसे कुटुंबाला धक्का बसला.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिसे यांनी वेळ न दवडता बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून आपले बँक खाते तात्पुरते ब्लॉक (Freeze) करण्याची सूचना केली. त्यानंतर बँकेत जाऊन स्टेटमेंट काढले असता नऊ व्यवहारांतून लाखो रुपये लांबवल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मोहन पिसे यांचे सुपुत्र अमन पिसे (वय २०) यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Fake Bank of India app fraud in Kalyan Bazarpeth police complaint
आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाने कोल्हापुरात मोठा सायबर दरोडा

पोलीस तपास आणि सायबर तज्ज्ञांचे आवाहन

अमन पिसे यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पैसे नक्की कोणत्या खात्यावर वर्ग झाले, याचा तांत्रिक तपास सुरू केला आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • कोणतेही आर्थिक व्यवहारांचे अ‍ॅप डाऊनलोड करताना ते बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरूनच डाऊनलोड करावे.

  • 'प्ले स्टोअर' किंवा 'अ‍ॅप स्टोअर'वर अ‍ॅप डाऊनलोड करताना डेव्हलपरचे नाव, रेटिंग्ज आणि रिव्ह्यू नक्की तपासावेत.

  • अ‍ॅप डाऊनलोड करताच कोणतीही गोपनीय माहिती (OTP, पासवर्ड, PIN) शेअर करू नये.

  • ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर तक्रार पोर्टल (1930) किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.

Banco News
www.banco.news