

भारतातील डिजिटल पेमेंट स्वीकारण्याचा वेग आता मध्यम पण स्थिर टप्प्यात दाखल झाला आहे. Reserve Bank of India (RBI) च्या डिजिटल पेमेंट इंडेक्स (DPI)नुसार, आर्थिक वर्ष २०२३ पासून डिजिटल व्यवहारांच्या वाढीचा दर वर्षानुवर्षे सुमारे ११ टक्क्यांवर स्थिरावला आहे. महामारीदरम्यान दिसलेल्या ३०-४० टक्क्यांच्या तीव्र वाढीनंतर आता वाढ अधिक मोजून-मापून होत असल्याचे संकेत या आकडेवारीतून मिळतात.
मार्च २०१८ हा आधार मानल्यास, सप्टेंबर २०२५ पर्यंत डीपीआय ५१६.७६ वर पोहोचला आहे - जो सुरुवातीच्या पातळीपेक्षा तब्बल पाच पट अधिक आहे. २०१९ मध्ये वाढीचा दर ७३ टक्क्यांपर्यंत गेला होता. मात्र, तज्ञांच्या मते सध्याची मंदावलेली वाढ ही गती कमी होण्याचे लक्षण नसून ‘बेस इफेक्ट’चा परिणाम आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये मोबाइल-आधारित व्यवहारांचे प्रमाण वर्षानुवर्षे सुमारे २७ टक्क्यांनी वाढले. त्याउलट इंटरनेट-आधारित व्यवहारांमध्ये सुमारे ८ टक्क्यांची घट झाली, तर एटीएममधून रोख पैसे काढण्याचे प्रमाण जवळपास १० टक्क्यांनी कमी झाले.
जरी व्यवहारांच्या संख्येत मोबाइल आघाडीवर असले तरी, व्यवहारांच्या मूल्याच्या दृष्टीने इंटरनेट बँकिंग वेगाने वाढत आहे. डिसेंबर २०२५ मध्ये इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहारांच्या मूल्यात वर्षानुवर्षे २४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली, तर मोबाइल व्यवहारांचे मूल्य जवळपास १७ टक्क्यांनी वाढले. यावरून दैनंदिन लहान व्यवहार मोबाईलकडे वळत असताना मोठ्या मूल्याचे व्यवहार पारंपारिक ऑनलाइन बँकिंगकडेच राहिल्याचे स्पष्ट होते.पीपीआय वाढ, एटीएम घट
प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI)ची संख्या वर्षानुवर्षे ५७ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. याउलट एटीएमची संख्या घटत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही घसरण रोख व्यवहारांवरील अवलंब कमी होत असल्याचे दर्शवते.
तज्ञांच्या मते, डिजिटल पेमेंट्सची वाढ आता स्थिर आणि टिकाऊ पातळीवर राहण्याची शक्यता आहे. २०-३० टक्क्यांची झेप पुन्हा दिसणे कठीण असले तरी, ग्रामीण व रोख-अवलंबित भागांमध्ये डिजिटल सक्षमीकरण, नवोपक्रम आणि व्यापक स्वीकार यामुळे पुढील टप्प्यात सातत्यपूर्ण वाढ होईल.
एकंदरीत, भारतातील डिजिटल पेमेंट इकोसिस्टम वेगवान झेपेतून स्थिर आणि परिपक्व वाढीकडे वळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.