

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था आणि कर्जपुरवठा क्षेत्रात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. वैयक्तिक (Personal Loan) आणि वाहन कर्जाला (Vehicle Loan) मागे टाकत 'सोने तारण कर्ज' (Gold Loan) आता ग्राहकोपयोगी कर्ज श्रेणीत गृहकर्जानंतर थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, आगामी दोन आर्थिक वर्षांत या क्षेत्राची वार्षिक वाढ (CAGR) सुमारे २८ टक्क्यांनी होण्याचा अंदाज आहे.
बँका आणि बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFC) पोर्टफोलिओमध्ये सोने तारण कर्जाचे स्थान आता अत्यंत महत्त्वाचे ठरले असून एकूण ग्राहक कर्जामध्ये याचा वाटा १५.७ टक्क्यांवर गेला आहे.
कर्ज क्षेत्रातील स्थिती आणि आकडेवारी
आर्थिक वर्ष २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ४४.४ अब्ज रुपयांसह गृहकर्ज पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या सोने तारण कर्जाचा थकीत आकडा १८.६ अब्ज रुपयांवर पोहोचला आहे. या शर्यतीत वैयक्तिक कर्जे (१६.५ अब्ज रुपये) आणि वाहन कर्जे (९.३ अब्ज रुपये) मागे पडली आहेत.
गेल्या तीन वर्षांत बँकिंग प्रणालीतील किरकोळ सोने तारण कर्जामध्ये तब्बल ७८ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. या तुलनेत गृहकर्जात १८ टक्के, वाहन कर्जात १३ टक्के, इतर वैयक्तिक कर्जांमध्ये १३ टक्के आणि क्रेडिट कार्ड क्षेत्रात १० टक्क्यांचीच वाढ नोंदवली गेली आहे.
२८ हजार टन सोने आणि आर्थिक संधी
भारतीय कुटुंबांकडे अंदाजे २८ हजार टन सोने उपलब्ध असून त्याचे सध्याचे मूल्य ३८० लाख कोटी ते ३९० लाख कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
एवढा प्रचंड साठा असूनही, या मालमत्तेपैकी केवळ ८ टक्के सोनेच संघटित सोने-तारण कर्ज बाजाराद्वारे औपचारिक आर्थिक व्यवहारात आणले गेले आहे. या सोन्याचे सरासरी कर्ज-मूल्य (LTV) ६० टक्के गृहीत धरल्यास, भारताच्या कर्जपुरवठा आणि वित्तीय क्षेत्रात सोने तारण कर्जाच्या माध्यमातून अजूनही मोठी संधी उपलब्ध असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.