

आपल्या उत्पन्नातील काही भाग भविष्यासाठी सुरक्षित राहावा, म्हणून प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पगारातून 'पीएफ' (Provident Fund) कापला जातो. निवृत्तीनंतरचा काळ सुखाचा जावा किंवा ऐनवेळेस येणाऱ्या आर्थिक अडचणींना तोंड देता यावे, यासाठी हा पीएफ फंड म्हणजे लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा मोठा आर्थिक आधार असतो. पण, "माझ्या पीएफ खात्यात नक्की किती पैसे जमा झाले आहेत?" हा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना नेहमी पडत असतो. पूर्वी हा बॅलन्स तपासण्यासाठी कार्यालयांचे चकरा माराव्या लागायच्या किंवा क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागेल, अशी भीती वाटायची.
या सुविधेचा लाभ कसा घ्यावा, याची सविस्तर आणि सोपी माहिती खालीलप्रमाणे:
EPFO ने दिलेल्या सुविधेनुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागेल.
नंबर नोट करून घ्या: कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईलवरून 9966044425 या क्रमांकावर कॉल करायचा आहे.
प्रक्रिया: हा कॉल केल्यानंतर दोन रिंगा वाजून तो आपोआप कट होईल. कॉल कट होताच काही सेकंदांत तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल. या मेसेजमध्ये तुमच्या खात्यात एकूण किती रक्कम जमा आहे आणि शेवटचे योगदान किती होते, याची सविस्तर माहिती दिलेली असेल.
जर काही कारणास्तव मिस्ड कॉल लागत नसेल, तर EPFO ने SMS द्वारे देखील बॅलन्स तपासण्याचा पर्याय दिला आहे.
यासाठी तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन EPFOHO UAN असे टाईप करा आणि हा मेसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
मेसेज पाठवल्यानंतर लगेचच तुम्हाला परतीचा मेसेज येईल, ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याची सद्यस्थिती समजेल.
या सुविधेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही सेवा केवळ इंग्रजी किंवा हिंदीपुरती मर्यादित नाही. देशातील सर्वसामान्य नागरिकाला समजेल अशा मराठी, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू यांसह अनेक भारतीय भाषांमध्ये ही माहिती मिळवता येते.
उदाहरणार्थ: जर तुम्हाला ही माहिती मराठीत हवी असेल, तर मेसेज बॉक्समध्ये EPFOHO UAN MAR असे टाईप करून तो मेसेज ७७३८२९९८९९ वर पाठवावा लागेल. (हिंदीसाठी HIN, गुजरातीसाठी GUJ असे कोड वापरावेत.)
ही डिजिटल सुविधा पूर्णपणे मोफत आणि सुरक्षित असली, तरी त्याचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण असणे आवश्यक आहे:
मोबाईल नंबर: तुमचा मोबाईल क्रमांक EPFO कडे नोंदणीकृत (Registered) असणे अनिवार्य आहे.
UAN नंबर: तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय (Active) असावा.
KYC अपडेट: तुमच्या पीएफ खात्याशी बँक खाते आणि पॅन कार्ड (PAN) यांसारखी KYC माहिती जोडलेली असणे गरजेचे आहे. जर तुमची KYC पूर्ण नसेल, तर तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.
EPFO चे हे पाऊल डिजिटल इंडियाच्या दिशेने अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ तर वाचेलच, शिवाय मध्यस्थांची गरजही उरणार नाही. थेट तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर माहिती येत असल्याने ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आजच तुमचा मोबाईल उचला आणि एका मिस्ड कॉलवर तुमच्या कष्टाच्या पैशांचा हिशोब जाणून घ्या!