

देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या ग्राहकांसाठी एकाच वेळी दोन मोठे धमाके केले आहेत. यंदा कर्मचाऱ्यांना पीएफच्या व्याजासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागणार नसून, येत्या १५ जुलैपर्यंत तब्बल ३४ कोटी पीएफ खात्यांमध्ये ८.२५ टक्के दराने व्याज जमा करण्याची घोषणा EPFO ने केली आहे. यासाठी एकूण १.४४ लाख कोटी रुपयांच्या व्याजाची रक्कम थेट खात्यांमध्ये वर्ग केली जाणार आहे.
या आर्थिक लाभासोबतच, EPFO ने आपली संपूर्ण कार्यपद्धती बदलणारा आणि ग्राहकांचा त्रास वाचवणारा एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. संघटनेने 'CITES 2.01' (Centralised IT Enabled Services) ही नवीन डिजिटल प्रणाली लागू केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे पीएफ क्लेम, ट्रान्सफर आणि पेन्शनशी संबंधित सर्व सेवा आता अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ होणार आहेत.
नव्या डिजिटल प्रणालीमुळे पीएफ बॅलन्स तपासणे, क्लेमची सद्यस्थिती (Status) पाहणे आणि पेन्शनशी संबंधित सर्व माहिती एकाच केंद्रीय पोर्टलवर उपलब्ध होईल. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, आता कर्मचाऱ्यांना विशिष्ट 'होम ऑफिस' किंवा ठराविक EPFO कार्यालयावर अवलंबून राहावे लागणार नाही. देशातील कोणत्याही EPFO कार्यालयातून कर्मचाऱ्यांना आपल्या खात्याशी संबंधित सेवा मिळवता येतील.
अनेकदा कागदपत्रांमधील त्रुटी किंवा चुकीच्या माहितीमुळे पीएफ क्लेम नाकारला (Reject) जातो आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, आता नवीन सिस्टीममध्ये क्लेम अर्ज सबमिट करण्यापूर्वीच, कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास सिस्टीम स्वतःहून त्याची पूर्वसूचना देईल. यामुळे अर्ज चुकून क्लेम नाकारला जाण्याचे प्रमाण नगण्य होईल. तसेच, सदस्य कोणत्या कारणासाठी आणि किती रक्कम काढू शकतात, याची स्पष्ट माहिती त्यांना आधीच स्क्रीनवर दिसेल.
नव्या प्रणालीअंतर्गत EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा थेट १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. ज्या खातेदारांचे केवायसी (KYC) पूर्ण आहे, त्यांचे ५ लाख रुपयांपर्यंतचे अॅडव्हान्स क्लेम अत्यंत वेगाने मंजूर केले जातील. जर क्लेम प्रक्रियेदरम्यान काही अतिरिक्त माहिती हवी असेल, तर ती ऑनलाइनच मागवली जाईल आणि सदस्यांनाही ऑनलाइनच उत्तर देता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही.
पूर्वी पीएफ काढण्यासाठी असलेले १३ वेगवेगळे गुंतागुंतीचे नियम आता इतिहासजमा झाले आहेत. या नियमांचे सुलभीकरण करून ते फक्त तीन सोप्या श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहेत. सदस्य आता त्यांच्या एकूण पीएफ बॅलन्सपैकी ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम सहज काढू शकतील. विशेष म्हणजे, क्लेम मंजूर झाल्याच्या दिवशीच रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल आणि अंतिम मंजुरीच्या तारखेपर्यंत पीएफवर व्याज देखील मिळत राहील.
सतत नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे मोठा जॅकपॉट ठरला आहे. आता युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) जोडलेला असल्यास, नोकरी बदलताच पीएफचा पैसा आपोआप (Automatically) नवीन कंपनीकडे ट्रान्सफर होईल. यासाठी कर्मचाऱ्याला कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची किंवा जुन्या व नवीन नियोक्त्याची (Employer) मंजुरी घेण्याची गरज पडणार नाही. कर्मचाऱ्याचा सेवा कालावधी (Service Period) देखील आपोआप हस्तांतरित केला जाईल.
या डिजिटल क्रांतीचा थेट फायदा 'ईपीएस' (EPS) पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँक खात्यामध्ये आपली पेन्शन जमा करून घेऊ शकतील. तसेच, हयात असल्याचा पुरावा म्हणजेच 'जीवन प्रमाणपत्र' (Life Certificate) सादर करण्यासाठी त्यांना ठराविक बँकेत किंवा कार्यालयात जाण्याची गरज नाही; ते देशातील कोणत्याही EPFO कार्यालयात जाऊन आपले जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतील.
EPFO चा हा निर्णय केवळ तंत्रज्ञान बदलापुरता मर्यादित नसून तो ग्राहकभिमुख प्रशासनाचा (Customer-Centric Governance) एक उत्तम नमुना आहे. वर्षानुवर्षे पीएफच्या पैशांसाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारणाऱ्या नोकरदार वर्गाला या 'क्लिक अॅण्ड गो' (Click and Go) प्रणालीमुळे मोठा दिलासा मिळेल. वेळेत मिळणारे व्याज आणि ५ लाखांपर्यंतचे ऑटो क्लेम यामुळे कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशांची सुरक्षा आणि तरलता (Liquidity) दोन्ही वाढणार आहे. डिजिटल भारताच्या दिशेने पडलेले हे एक स्वागतार्ह पाऊल आहे.