

देवळा : नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या दि देवळा मर्चंटस् को-ऑप. बँक लि., देवळा येथे लिपिक (Clerk) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. बँकेच्या प्रशासकीय कार्यालय व मुख्य शाखा, भाग्योदय, देवळा येथे ही भरती राबविण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. भरतीसंदर्भातील सर्व अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत तसेच इतर तपशील फेडरेशनच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ₹ ९५०/- परीक्षा शुल्क व त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार असून एकूण शुल्क ₹ १,१२१/- इतके राहणार आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार असून सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. मुदतीनंतर किंवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील तरुणांसाठी सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध करून देणारी ही भरती प्रक्रिया ठरणार असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, पात्रता अटी, परीक्षा स्वरूप व इतर नियम व अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी http://www.mucbf.in/ या वेबसाइटला भेट द्यावी. तसेच बँकेविषयी अधिक माहितीसाठी www.demcobank.in या अधिकृत संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध आहे.