ऑनलाइन शॉपिंग करताय? क्रेडिट कार्ड की 'बाय नाऊ पे लेटर'?

ऑनलाइन शॉपिंगसाठी जाणून घ्या कोणता पर्याय ठरेल सर्वात फायदेशीर! क्रेडीट कार्ड की BNPL
credit card vs buy now pay later - Online  Shopping
Credit Card vs BNPL: पैशांची बचत कुठे आणि आर्थिक फटका कुठे? समजून घ्या दोन्हीतील फरक!
Published on
मुंबई: आजकाल डिजिटल क्रांतीमुळे ऑनलाइन शॉपिंग करणे अत्यंत सोपे आणि सोयीस्कर झाले आहे. अवघ्या काही मिनिटांत आपण आपल्या पसंतीची वस्तू घरबसल्या खरेदी करू शकतो. मात्र, वस्तू खरेदी केल्यानंतर पेमेंट करताना ग्राहकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. पूर्वी केवळ डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग यावर अवलंबून राहावे लागत होते, परंतु आता 'बाय नाऊ, पे लेटर' (BNPL) हा नवा पर्याय वेगाने लोकप्रिय होत आहे.

क्रेडिट कार्ड आणि 'बाय नाऊ, पे लेटर' या दोन्ही सुविधा ग्राहकाला 'आधी खरेदी करा आणि पैसे नंतर द्या' हीच सुविधा देतात. वरवर पाहता या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटत असल्या, तरी त्यांच्या कार्यपद्धतीत, नियमांत आणि फायदे-तोट्यांमध्ये मोठा फरक आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना आर्थिक फटका बसू नये आणि जास्तीत जास्त फायदावा यासाठी या दोन्ही पर्यायांचा सविस्तर आढावा घेणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्ड हे प्रामुख्याने देशातील अग्रगण्य बँका किंवा मान्यताप्राप्त वित्तीय संस्थांद्वारे दिले जाते. हे कार्ड मिळवण्यासाठी ग्राहकाचे उत्पन्न आणि त्याचे पतमानांकन म्हणजेच सिबिल स्कोअर (Credit Score) तपासला जातो. या निकषांच्या आधारे ग्राहकाला एक ठराविक 'क्रेडिट लिमिट' (कर्ज मर्यादा) दिली जाते.

क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यावर साधारणपणे २० ते ५० दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो. या ठराविक कालावधीत पैसे भरल्यास कोणतेही अतिरिक्त व्याज द्यावे लागत नाही. तसेच, जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल दरमहा वेळेवर आणि पूर्ण भरले, तर तुमचा क्रेडिट स्कोअर मजबूत होतो, ज्याचा फायदा भविष्यात गृहकर्ज किंवा वाहनकर्ज घेताना होतो. याशिवाय ऑनलाइन शॉपिंग करताना क्रेडिट कार्डवर भरपूर कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स, बँक डिस्काउंट ऑफर्स आणि एअरपोर्ट लाउंज ॲक्सेससारख्या प्रीमियम सुविधा मिळतात.

मात्र, क्रेडिट कार्ड वापरताना आर्थिक शिस्त न पाळल्यास मोठी जोखीम असते. जर बिल वेळेवर भरले नाही, तर त्यावर वार्षिक ३६% ते ४८% पर्यंत प्रचंड व्याज आणि लेट फी आकारली जाते, ज्यामुळे ग्राहक कर्जबाजारी होण्याचा धोका असतो.

credit card vs buy now pay later - Online  Shopping
भारताचे पहिले 'LED' क्रेडिट कार्ड लाँच! जाणून घ्या काय आहे खास.

'बाय नाऊ, पे लेटर' (आता खरेदी करा, नंतर पैसे द्या) ही प्रामुख्याने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि फिनटेक कंपन्यांनी सुरू केलेली आधुनिक अल्पमुदतीची कर्ज सुविधा आहे.

क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी असणारे कडक निकष आणि कागदपत्रांच्या कटकटी BNPL मध्ये नसतात. ही सुविधा अवघ्या काही मिनिटांत, अगदी कमी कागदपत्रांच्या आधारे (केवळ पॅन किंवा आधार कार्डवर) सक्रिय होते. याद्वारे खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे १५ ते ३० दिवसांत एकरकमी किंवा छोट्या हप्त्यांमध्ये (No-Cost EMI) देण्याची सोय असते. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही किंवा ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे, त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरते.

पण, दुसरीकडे ही सुविधा सहज मिळत असल्याने ग्राहकांकडून अनावश्यक खरेदी होण्याचे प्रमाण वाढते. तसेच, जर ठरलेल्या वेळेत पेमेंट चुकले, तर अत्यंत कडक 'लेट फी' वसूल केली जाते आणि त्याचा थेट नकारात्मक परिणाम ग्राहकाच्या क्रेडिट स्कोअरवर होतो.

  • आर्थिक शिस्त पाळणाऱ्या आणि नियमित उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांसाठी 'क्रेडिट कार्ड' हा नेहमीच सरस आणि अधिक फायदेशीर पर्याय ठरतो. याचे कारण म्हणजे याद्वारे मिळणारे कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि विविध सणासुदीच्या काळात तातडीने मिळणाऱ्या सवलती थेट पैशांची बचत करतात. शिवाय, यामुळे तुमची बँकिंग क्षेत्रातील पत सुधारते.

  • दुसरीकडे, जे ग्राहक तरुण आहेत, ज्यांच्याकडे नियमित क्रेडिट कार्ड नाही किंवा ज्यांना अगदी लहान रक्कमेची तात्पुरती आणि नजीकच्या काळात फेड करता येईल अशी सोय हवी आहे, त्यांच्यासाठी 'बाय नाऊ, पे लेटर' हा एक चांगला पर्यायी मार्ग ठरू शकतो.

credit card vs buy now pay later - Online  Shopping
क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरूनही CIBIL स्कोअर घसरतोय? कारण समजून घ्या!

जर तुमच्यात आर्थिक शिस्त असेल आणि तुम्ही वेळेत बिल भरू शकत असाल, तर क्रेडिट कार्ड निवडा. पण जर तुम्हाला क्रेडिट कार्डच्या प्रक्रियेत पडायचे नसेल आणि छोट्या खरेदीसाठी झटपट पर्याय हवा असेल, तर BNPL चा विचार करा. मात्र, दोन्ही पर्यायांचा वापर करताना आपली आर्थिक क्षमता ओळखून 'अति खरेदी' टाळणे हाच सुज्ञ ग्राहकाचा पाया आहे.

Banco News
www.banco.news