व्यंकटेश्वरा अर्बन सोसायटीला 'सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार' जाहीर

व्यंकटेश्वरा अर्बन सोसायटीचा सांगलीत गौरव; नागरी पतसंस्था गटात पटकावला द्वितीय क्रमांक!
व्यंकटेश्वरा अर्बन सोसायटी ईश्वरपूर - Best Urban Credit Co-operative Society in Maharashtra
उत्कृष्ट सेवा आणि शिस्तबद्ध कारभाराची राज्यस्तरावर दखल; मान्यवरांच्या हस्ते चेअरमन रघुनाथ बागडी यांनी स्वीकारला सन्मान.
Published on: 

इस्लामपूर / सांगली : सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय आणि दीपस्तंभासारख्या कामगिरीची दखल घेत ईश्वरपूर येथील 'व्यंकटेश्वरा अर्बन सोसायटी'ला नागरी पतसंस्था गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा प्रतिष्ठित 'सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सहकार तपस्वी गुलाबराव पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सांगली येथे पार पडलेल्या या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यंकटेश्वरा अर्बन सोसायटीचे चेअरमन रघुनाथ बागडी यांनी संस्थेच्या वतीने रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह स्वीकारले.

व्यंकटेश्वरा अर्बन सोसायटीचे पारदर्शक व शिस्तबद्ध कामकाज, सभासदांचा असणारा दृढ विश्वास, ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या अद्ययावत व दर्जेदार सेवा, तसेच संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाचे सातत्यपूर्ण परिश्रम यांची दखल घेऊन या राज्यस्तरीय पुरस्काराने संस्थेला गौरविण्यात आले आहे. पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीतील हा सन्मान म्हणजे संस्थेच्या प्रामाणिक कार्याची आणि हजारो सभासदांच्या विश्वासाची पावती मानली जात आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास सहकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक व संस्थेचे संस्थापक राहुलदादा महाडीक, मन्सूर खतीब, अनिता सगरे, वैभव शिंदे, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, विजय पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यंकटेश्वरा अर्बन सोसायटीने सहकार क्षेत्रात मिळवलेल्या या गौरवपूर्ण यशाबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, सर्व कर्मचारी आणि सन्माननीय सभासदांवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेने सहकार क्षेत्रातील आपली विश्वासार्हता, पारदर्शकता आणि प्रगतीची घोडदौड अशीच पुढे सुरू ठेवावी, अशा सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Banco News
www.banco.news