
खापरखेडा : राज्याच्या सहकार क्षेत्रातील प्रमुख व प्रतिष्ठित संस्था-महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, मुंबई या संस्थेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पतसंस्थांना दिला जाणारा ‘दीपस्तंभ पुरस्कार’ सन २०२४-२५ यावर्षी स्वयंशक्ती को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, खापरखेडा या संस्थेला प्राप्त झाला आहे.
हा पुरस्कार सोहळा नुकताच गोकर्ण कर्नाटक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमात राज्यभरातील सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष,संचालक,मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच फेडरेशनचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात स्वयंशक्ती को-ऑप. क्रेडिट सोसायटीला हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब कोयटे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.अनिल गोमकाळे, संचालक श्री. तुषार गोरले, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील गोमकाळे उपस्थित होते.
संस्थेने ग्रामीण भागात परवडणाऱ्या दरात संगणक शिक्षण, कौशल्यविकास प्रशिक्षण, लघु उद्योग प्रोत्साहन, तसेच आर्थिक साक्षरता उपक्रम राबवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. संस्थेच्या पारदर्शक कार्यपद्धती, उत्कृष्ट कर्जवितरण प्रणाली, ठेवीदारांचा विश्वास आणि सतत वाढणारे आर्थिक व्यवहार यामुळे स्वयंशक्ती क्रेडिट सोसायटीने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
संस्थेच्या या गौरवामुळे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, संस्थेच्या या सन्मानामुळे सहकार क्षेत्रातील नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे.