स्वयमशक्ती पतसंस्थेचा १०३ कोटींचा टप्पा पार; आता थेट ‘२०० कोटीं’चे ध्येय!

सभासदांना सलग दुसऱ्या वर्षी १५ टक्के लाभांश जाहीर; २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Swayamshakti Credit Co-operative Society Limited - Credit co-operative society 200 crore target news
२२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Published on

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर आणि अत्यंत वेगाने प्रगतीपथावर असलेली स्वयमशक्ती क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, खापरखेडा हिची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेने मागील आर्थिक वर्षात ५० कोटींवरून थेट १०३ कोटी रुपयांच्या विक्रमी व्यवसायाची ऐतिहासिक झेप घेतली असून, चालू वर्षासाठी २०० कोटींच्या व्यवसायाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल गोमकाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. यामध्ये महाराष्ट्रचे महामंत्री श्री. विवेकजी जुगादे विशेष अतिथी म्हणून, सहकार प्रशिक्षक (पुणे) श्री. मंगेशजी देहेटकर मार्गदर्शक म्हणून, तर नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्रजी घाटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ यावेळी आवर्जून उपस्थित होते.

एका वर्षात १००% व्यवसाय वाढ करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था

सभेच्या प्रास्ताविकात संस्थेच्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखाजोखा मांडण्यात आला. मागील आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांवर असणारा व्यवसाय यंदा १०३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एकाच वर्षात १००% व्यवसाय वाढ नोंदवणारी महाराष्ट्रातील ही एकमेव सहकारी संस्था ठरल्याचे नमूद करत उपस्थितांनी संस्थेच्या या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. सभासदांना सलग दुसऱ्या वर्षी १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याची घोषणा होताच सभेत आनंदाचे वातावरण पसरले.

सभेला मार्गदर्शन करताना सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांनी बदलत्या काळातील आव्हाने, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, पारदर्शक कारभार आणि सभासदकेंद्री सेवांवर भर दिला. श्री. विवेकजी जुगादे आणि श्री. राजेंद्रजी घाटे यांनी सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी पतसंस्थांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. तर श्री. मंगेशजी देहेटकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, गुणवत्तापूर्ण सेवा, आणि कर्जवसुलीची कार्यक्षमता वाढविण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात श्री. अनिल गोमकाळे यांनी संस्थेच्या यशाचे श्रेय सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना दिले. ते म्हणाले,

"सभासदांचा अफाट विश्वास आणि पारदर्शक कारभार हीच आमच्या संस्थेची खरी ऊर्जा आहे. भविष्यातही सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वेगवान व दर्जेदार सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."

सभेच्या माध्यमातून संस्थेच्या आगामी काळातील विकासाचे नवे क्षितिज निश्चित करण्यात आले असून, आगामी काळात स्वयमशक्ती क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला अधिक सक्षम, आधुनिक व आदर्श सहकारी संस्था म्हणून नावारूपास आणण्याचा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सभासदांच्या उत्स्फूर्त व मोठ्या उपस्थितीमुळे ही वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत दिमाखात संपन्न झाली.

Banco News
www.banco.news