

दि. २५ फेब्रुवारी २०२६, मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पुणे यांच्या वतीने भव्य पुरस्कार वितरण सोहळा आर्यन रिव्हरवुड रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातील विविध पतसंस्थांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आर्थिक वर्ष २०२४–२५ साठी सिंधुताई महिला नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित, तुमसर या संस्थेला नागपूर विभागातून द्वितीय क्रमांकाचा “दीपस्तंभ पुरस्कार” प्रदान करण्यात आला. संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगती, पारदर्शक कामकाज आणि सदस्याभिमुख सेवेमुळे हा सन्मान मिळाल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री उदय जोशी, भारतीय रिझर्व्ह बँक चे संचालक सतीश मराठे, ज्येष्ठ सहकार नेते ओमप्रकाश दादाप्या उर्फ काकासाहेब कोयटे तसेच इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
या वेळी उद्योजक सुशीलकुमार जैन आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन जयनारायण चिंधालोरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते संस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या यशामागे संस्थापक-अध्यक्ष सिंधुताई जयनारायण चिंधालोरे यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच संचालक मंडळ, सर्व सभासद, खातेदार, कर्मचारी, अभिकर्ते व हितचिंतक यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हा मानाचा पुरस्कार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
नागपूर विभागात उत्कृष्ट कामगिरी करून द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या या संस्थेच्या यशामुळे तुमसर परिसरासह संपूर्ण विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या पतसंस्थेने अल्पावधीत विश्वास, पारदर्शकता आणि सेवा यांचा आदर्श निर्माण केला असून, हा दीपस्तंभ पुरस्कार संस्थेच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे.