

चिंबळी फाटा : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य आणि सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या 'श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित' (चिंबळी फाटा) या संस्थेचा रौप्य महोत्सव वर्ष सांगता समारंभ नुकताच (२१ मे रोजी) मोशी येथील सिझन बँक्वेट हॉलमध्ये अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. गेल्या २५ वर्षांत संस्थेने केलेल्या प्रगतीचा आणि एकूणच सहकार चळवळीतील योगदानाचा गौरव करणारा हा सोहळा ठरला.
या दिमाखदार सोहळ्याला सहकार आणि राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (PDCC) उपाध्यक्ष सुनिलजी चांदेरे, माजी अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, सागर मुऱ्हे, कमलताई कड, आणि गौरीताई चंदनदादा मुऱ्हे यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनिलजी चांदेरे आणि माजी अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी, "श्री समर्थ पतसंस्थेने २५ वर्षांत कमावलेला सभासदांचा विश्वास हीच संस्थेची खरी पुंजी आहे," अशा शब्दांत संस्थेच्या कारभाराचे कौतुक केले. तसेच, बदलत्या आर्थिक प्रवाहात संस्थेने आपले वेगळेपण कसे टिकवून ठेवले, यावर प्रकाश टाकला.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमोल गवारे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या २५ वर्षांच्या खडतर आणि यशस्वी प्रवासाची यशोगाथा वाचनातून आणि एका प्रभावी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडली. यामध्ये विविध शाखांचा विस्तार, वाढता व्यवसाय आणि ग्राहकाभिमुख सेवा यांमुळे संस्थेने गाठलेले यशाचे शिखर अधोरेखित करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक आणि आधारस्तंभ संभाजीशेठ गवारी यांनी याप्रसंगी सर्व सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गवारी यांनी भविष्यातील ध्येय-धोरणे मांडताना सांगितले की,
"आगामी काळात पतसंस्थेचा अधिक शाखा विस्तार करणे, व्यवसाय वृद्धी करणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना अधिक दर्जेदार व गतिमान सेवा देणे, हाच संस्थेचा मुख्य संकल्प आहे."
या सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष 'स्मरणिकेचे' प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्मरणिकेत संस्थेच्या २५ वर्षांच्या आठवणींना आणि प्रगतीला उजाळा देण्यात आला आहे.
या प्रसंगी संस्थेच्या सचिव विद्याताई गवारी, संचालक विनोद माझिरे, देवेंद्र घोटकुले आणि सभासद प्रशांत कोल्हे यांनी आपली मनोगते व्यक्त करत संस्थेच्या प्रगतीमध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या सर्वांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आदेश टोपे, अर्जुन जाधव आणि संतोष साकोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संतोष गवारी यांनी मानले. अत्यंत कौटुंबिक आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची सांगता सामूहिक 'पसायदानाने' झाली.