
कराड कृष्णाकाठ: १ ऑक्टोबर २०२५ रोजी साजऱ्या होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मळाई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शेती मित्र अशोकराव थोरात भाऊ, पतसंस्थेचे चेअरमन अजित थोरात काका, संस्थेचे संचालक शंकराव चांदे,तसेच आप्पा आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमराव शेवाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव शेवाळे सर यांनी केले.
यावेळी शास्त्रीनगर, मलकापूर येथील आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या पाच ज्येष्ठांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराच्या यादीत दादासो गरुड कदम, मच्छिंद्र अण्णा पाटील, भीमराव बापू शेवाळे, शांताराम ज्ञानदेव पाटील आणि तुकाराम दत्तात्रय पवार यांचा समावेश होता. दादासो कदम यांनी सत्कार स्वीकारताना ज्येष्ठांनी समाजात आपले स्थान कसे निर्माण करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, नारायण गंधे, वामन अवसारे, रमेश कुलकर्णी, झुंजारराव झेंडे व अजित थोरात काका यांनी ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या आणि मनोगत व्यक्त केले.
अशोकराव थोरात भाऊ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "सेवानिवृत्तीचा कालावधी कंटाळवाणा वाटू नये, कुटुंबीयांमध्ये अडचण निर्माण होऊ नये, यासाठी छंद जोपासले पाहिजेत, नातवंडांबरोबर वेळ घालवला पाहिजे, घरकामात मदत केली पाहिजे आणि सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागले पाहिजे." कार्यक्रमास जिजाऊ महिला संघाच्या उपाध्यक्ष शांता मुळे आणि संघाचे सर्व सदस्य, तसेच आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद व सल्लागार उपस्थित होते. पतसंस्थेचे सचिव सर्जेराव शिंदे, शाखाप्रमुख सौ. शर्मिला श्रीखंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर हिंदुराव चव्हाण सर यांनी सर्वांचे आभार मानले. समारंभाच्या शेवटी सर्व ज्येष्ठांना पतसंस्थेच्या वतीने भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.