श्री चौंडेश्वरी पतसंस्थेकडून सभासदांना ११% लाभांश, तर कर्मचाऱ्यांना १२% बोनस जाहीर

३० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार; २२ लाखांचा निव्वळ नफा; कोल्हापूर जिल्ह्यात विस्ताराची नवी झेप, इचलकरंजी शाखा लवकरच सेवेत
Shree Choundeshwari Pat Sanstha - Cooperative society dividend rates 2026
पारदर्शक कारभार आणि आर्थिक शिस्तीच्या जोरावर श्री चौंडेश्वरी पतसंस्थेची गरुडभरारी; २२ लाखांच्या निव्वळ नफ्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रास मंजुरी
Published on

पलूस: सभासदांचा दृढ विश्वास, पारदर्शक कारभार आणि आर्थिक शिस्तीच्या जोरावर श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने प्रगतीची यशस्वी घोडदौड कायम राखली आहे. संस्थेच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडताना सभासदांना ११ टक्के लाभांश आणि कर्मचाऱ्यांना १२ टक्के बोनस देण्याची घोषणा करण्यात आली.

संस्थेच्या वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्राची अधिकृत परवानगी संस्थेला मिळाली आहे. या मंजुरीमुळे विस्ताराला मोठी चालना मिळणार असून, इचलकरंजी येथे संस्थेची चौथी शाखा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा संस्थापक सूर्यकांत काका बुचडे यांनी अध्यक्षीय भाषणात केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना सूर्यकांत काका बुचडे म्हणाले, "संस्थेने केवळ संख्यात्मक वाढ न करता सुयोग्य व्यवस्थापन आणि सभासदहित केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्राची मंजुरी मिळणे हा अभिमानाचा क्षण असून, इचलकरंजी शाखेद्वारे अधिकाधिक नागरिकांपर्यंत गुणवत्तापूर्ण सेवा पोहोचवण्याचा आमचा मानस आहे."

Shree Choundeshwari Pat Sanstha annual general meeting news

आर्थिक स्थितीचा भक्कम आलेख

संस्थेचे चेअरमन चंद्रदीप भैय्या बुचडे यांनी वार्षिक अहवाल मांडताना संस्थेच्या मुख्य आर्थिक बाबींची माहिती दिली:

  • एकूण ठेवी: सुमारे ३० कोटी रुपये.

  • कर्जवाटप: २० कोटी रुपये (यामध्ये ४.५ कोटी रुपयांच्या सोनेतारण कर्जाचा समावेश).

  • गुंतवणूक: १० कोटी रुपये.

  • स्वनिधी: १.६५ कोटी रुपये.

  • निव्वळ नफा: २२ लाख रुपये.

चेअरमन चंद्रदीप बुचडे यांनी सांगितले की, सभासदांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद आहे. या विश्वासाच्या जोरावरच संस्था सातत्याने प्रगतीपथावर असून, याच नफ्याचा लाभ म्हणून ११% लाभांश व कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल १२% बोनस देण्यात येत आहे.

सभासदांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन संस्थेमार्फत स्पर्धात्मक व्याजदरात सोनेतारण कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेच्या कर्जवाटपामध्ये ४.५ कोटी रुपयांच्या सोनेतारण कर्जाचा समावेश असून, सभासदांना आवश्यक वेळी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यास संस्था कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सभेपूर्वी गुजले साहेब यांच्या वतीने सभासदांसाठी कामकाज आणि आर्थिक व्यवहारांसंबंधी मार्गदर्शनपर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नगरसेविका सारिका खारकांडे, पत्रकार तुकाराम धायगुडे, सामाजिक कार्यकर्ते मानसिंग इनामदार आणि सीए गिरीश मोहिते यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Shree Choundeshwari Pat Sanstha annual general meeting news

उत्साहपूर्ण वातावरणात सभा संपन्न

सभेच्या प्रारंभी व्हाईस चेअरमन विशाल म्हेत्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्य व्यवस्थापक बिरुदेव शिंदे, अक्षयजीत गुरव आणि योगेश बुचडे यांनी वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. आभार संचालक प्रमोद बुचडे यांनी मानले.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक रविंद्र बुचडे साहेब, शंकर वैद्य गुरुजी आणि लेखापरीक्षक संदीप सावंत यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या वार्षिक सर्वसाधारण सभेस जी. आर. पाटील साहेब, कपिल गायकवाड, अविनाश बुचडे, धोंडीराम रेपाळ, नंदकुमार खारकांडे, विपुल तारळेकर, गणेश चोथे, गुंडाभाऊ पाटील, विकास लाटे, सनी बुचडे, बबन गायकवाड, पांडुरंग बुचडे, विशाल दिवटे, गणेश बुचडे, वसंत कुलकर्णी, हरिभाऊ वरुडे, सचिन डाके, शशिकांत आप्पा रेपाळ, यशवंत कदम, योगेश रसाळ, किशोर बुचडे, संकेत बुचडे, निखिल बुचडे, भीमराव पोळ, गिरीश एकार, शरद बुचडे, सतीश बुचडे, लखन रावळ, लक्ष्मण बुचडे,मिलिंद बुचडे , चंद्रकांत पाटील सौ. लता बुचडे, सौ. योगिता बुचडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सल्लागार, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banco News
www.banco.news