ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ! शामराव पाटील पतसंस्थेचा ३८० कोटींचा टप्पा पार!

सभासदांचा विश्वास अधिक दृढ; उंडाळे येथील वार्षिक सभेत अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांचे प्रतिपादन.
Shamrao Patil Pat Sanstha business reaches 380 crore
उंडाळे : मान्यवरांच्या उपस्थितीत बोलताना अ‍ॅड. उदयसिंह पाटील.
Published on

उंडाळे (प्रतिनिधी) : ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम बळ देत सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यात कै. स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. संस्थेने ३८० कोटी रुपयांचा समिश्र व्यवसाय पूर्ण करत आपली उच्च आर्थिक गुणवत्ता आणि पारदर्शकता अधोरेखित केली आहे, यामुळेच आज सभासदांचा पतसंस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, असे प्रतिपादन रयत साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले.

उंडाळे येथे पार पडलेल्या कै. स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे होते.

अ‍ॅड. उदयसिंह पाटील पुढे म्हणाले की, "सध्या सहकार क्षेत्रात अत्यंत झपाट्याने आणि क्रांतिकारक बदल होत आहेत. नवीन कायदे, बदलती शासकीय धोरणे आणि बाजारपेठेतील वाढती स्पर्धा लक्षात घेता, संचालक मंडळासह सर्वांनीच या बदलांचा वेध घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व कार्यपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे."

३८० कोटींचा व्यवसाय अन् २९ शाखांचे नेटवर्क

संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडताना चेअरमन शहाजी शेवाळे यांनी सांगितले की, संस्थेने २९ शाखांच्या नेटवर्कद्वारे आपल्या कारभाराचा विस्तार केला आहे. सध्या संस्थेकडे:

  • एकूण ठेवी: २०१ कोटी १२ लाख रुपये

  • कर्जवाटप: १७९ कोटी ५७ लाख रुपये

  • गुंतवणूक: ५८ कोटी ५८ लाख रुपये

  • खेळते भागभांडवल: ३३५ कोटी २३ लाख रुपये

या सर्व आकडेवारीवरून संस्थेची आर्थिक घडी अत्यंत मजबूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वार्षिक सभेस प्रा. धनाजी काटकर, नितीन थोरात, अनिल मोहिते, जे. डी. मोरे, बाबुराव धोकटे, शिवाजीराव जाधव, शंकरराव इंगवले आणि के. टी. पाटील यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला व्यवस्थापक अधिकराव शेळके यांनी वार्षिक सभेची नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बोत्रे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. सभेच्या शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धनाथ घराळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Banco News
www.banco.news