

चिपळूण: येथील श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 'अपरांत हॉस्पीटल, चिपळूण' येथे भव्य रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात चिपळूण परिसरातील सभासद, कर्मचारी आणि सेवाभावी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ५३ जणांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबीराचा औपचारिक शुभारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रभाकरजी आरेकर यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजनाने झाला. तसेच अपरांत हॉस्पीटलचे संचालक डॉ. अब्बास जबले, डेरवण हॉस्पीटलच्या डॉ. सुनिता झुंजारवाड, डॉ. जितेंद्र सप्रे, रवि अग्रवाल आणि संस्थेच्या संचालक मंडळाच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अपरांत हॉस्पीटलचे संचालक डॉ. अब्बास जबले आणि डेरवण हॉस्पीटलच्या डॉ. सुनिता झुंजारवाड यांनी "रक्तदानाचे महत्त्व आणि गरज" या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. रौप्यमहोत्सवी वर्षात असा सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी श्री समर्थ भंडारी पतसंस्थेचे विशेष कौतुक केले.
या शिबीराचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल ९६ वेळा रक्तदान करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. मिलिंदजी चितळे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रभाकरजी आरेकर यांनी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच शिबीरासाठी मोलाचे सहकार्य करणारे:
कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (डेरवण) चे डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ
आरोग्यविषयक सर्व सोयीसुविधांसह हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल अपरांत हॉस्पीटलचे डॉ. यतीनजी जाधव व त्यांचे सहकारी
या सर्वांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद मानण्यात आले.
या रक्तदान शिबीराला राजकीय, सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यामध्ये चिपळूण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती नगरसेवक श्री. कपिलजी शिर्के, पाणी पुरवठा सभापती नगरसेवक श्री. निहारजी कोवळे, वालोपेचे सरपंच श्री. प्रतीकजी सुर्वे तसेच पतसंस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक सर्वश्री दिलीप मयेकर, सुहास भोसले, अरुण पाटील, पराग आरेकर, दिलीप वानकरकर, उदय वेल्हाळ, विजय जाधव, संचालिका सौ. स्मिता आरेकर, श्रीम. प्रज्ञा नरवणकर, अनेक मान्यवर सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार संस्थेचे व्यवस्थापक श्री. संदीप रहाटे यांनी मानले.