

पुणे : राज्यातील पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांसाठी सुधारीत ‘आदर्श उपविधी’ लागू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सर्व जिल्हा उपनिबंधकांना निर्देश जारी केले आहेत.
सहकार आयुक्त कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, राज्यातील सर्व पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था तसेच पतसंस्था फेडरेशन यांना सुधारीत आदर्श उपविधीची प्रत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित संस्थांनी पुढील वार्षिक अथवा विशेष सर्वसाधारण सभेत हे सुधारीत उपविधी स्वीकारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पतसंस्थांना या निर्णयाबाबत मार्गदर्शन व सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सुधारणेमुळे पतसंस्थांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, शिस्त आणि प्रशासनिक सुसूत्रता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.