
कारंजा येथील प्रशिक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बहुचर्चित निवडणुकीत सत्तारूढ 'विकास पॅनेल'चा दणदणीत विजय झाला. निकाल जाहीर होताच विकास पॅनेल'च्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले. मुलजीजेठा हायस्कूल येथे आज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानानंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली. संस्थेच्या एकूण २९०७ सभासद मतदारांपैकी १८७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या 'विकास पॅनेल'ने मतमोजणीअखेर सर्व ११ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला.
मतदारांचा ठाम विश्वास:
संस्थेने ग्राहकांसाठी राबवलेले विविध विकासात्मक उपक्रम, कर्ज वितरणातील पारदर्शकता, तसेच शेतकरी व लघुउद्योगांना दिलेला विश्वासार्ह आधार यामुळेच 'विकास पॅनेल'ला मतदारांनी एकमुखाने पसंती दिली. त्यामुळे पॅनेलमधील सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी झाले. विजयी झालेले विकास पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे -
बंड आशिष माणिकलाल, भगत पांडुरंग मोतीराम, करहे आकाश भास्करराव, पाद्रेण ओंकार श्रीरामजी, राऊत कृष्णा विठ्ठलराव, सटोटे गुलाबराव चंपतराव, रामटेके रवि काशीनाथ, काळे प्रशांत नारायण, उकर्डे अनघा आनंद, ऊके सुनीता दिपक, जुमळे मेघन मधुकर.
विरोधी पॅनेलचा पराभव:
या निवडणुकीत 'सहकार पॅनेल"ने आव्हान दिले होते. मात्र, मतदारांचा कल पूर्णपणे 'विकास पॅनेलकडे झुकल्याने विरोधकांचा एकाही जागेवर विजय झाला नाही.
जल्लोषाचे वातावरण:
निकाल जाहीर होताच कारंजा शहरात व परिसरात गुलालाची उधळण तसेच ढोल-ताशे, फटाक्यांच्या आवाजाने वातावरण दणाणून गेले. कार्यकर्त्यांनी उत्साहाने जल्लोष करत 'विकास पॅनेल जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. या विजयामुळे संस्थेकडून पुढील काळात अधिक विकासात्मक निर्णयांची अपेक्षा नागरिक व ग्राहक व्यक्त करत आहेत. या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक पी. टी. सरकटे व निवडणूक अधिकारी संजय सांगड़े यांनी काम पाहिले.
सभासद सुज्ञ मतदार असतो व त्यांचे बँकेशी विश्वासाचे नाते निर्माण झालेले असते. विरोधकांनी खोट्या बातम्या प्रसारित करुन संस्थेची बदनामी करुन आटापिटा केला मात्र, मतदारांनी संस्थेच्या प्रगतशील वाटचालीवर विश्वास ठेवला. त्यामुळे विरोधकांना घरचा रस्ता धरावा लागला, अशी प्रतिक्रिया व्यवस्थापिका सौ. आशा राऊत यांनी व्यक्त केली.