
कारंजा येथील प्रथितयश "प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेची" निवडणूक येत्या ७ सप्टेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीत विद्यमान संचालकांचे विकास पॅनेल प्रचारात आघाडीवर आहे. यानिमित्त बँकेचे विद्यमान अध्यक्ष ॲड. रवी काशिनाथ रामटेके यांनी, सभासदांनी आम्ही सुरु केलेल्या विविध विकास योजना व प्रस्तावित असलेल्या योजना विचारात घेऊन आमच्या पॅनेलला भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.
प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विकास पॅनेलकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून ॲड. रवी काशिनाथ रामटेके, महिला राखीव जागावर सौ. सुनिता दिपक उके व अनघा आनंद उकर्डे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रशांत नारायण काळे, विमुक्त जाती / भटक्या जमाती प्रवर्गातून मेघन मधुकर जुमळे, सर्वसाधारण प्रवर्गातून कृष्णा विठ्ठलराव राऊत, पांडुरंग मोतीराम भगत, आकाश भास्कर कऱ्हे, आशिष माणिकलाल बंड, गुलाबराव चंपतराव साटोटे आणि ओंकार श्रीरामजी पाढेन हे उमेदवार रिंगणात आहेत.
मागील वर्षी सत्ताधारी संचालकांकडून संस्थेत मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली. बँकेची स्वतःची इमारत व प्रशस्त वेअरहाऊस उभारण्यात आले असून शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठा, माल तारण कर्ज योजना, दर्जेदार बियाणे पुरवठा यासारख्या अनेक सुविधा सुरू आहेत.याशिवाय लवकरच शेतकरी सभासदांसाठी प्रोड्युसर कंपनी स्थापन होत असून त्याअंतर्गत शीतगृह, बियाणे बँक, सोयाबीन ऑइल प्रकल्प यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांना थेट फायदा होणार आहे. ग्राहक व सभासद यांना मिळालेल्या या सुविधा आणि विकासामुळे यावेळी पुन्हा एकदा विकास पॅनेलला विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे, असे अध्यक्ष ॲड. रामटेके यांनी पत्रकात म्हटले आहे.