

लातूर : प्रभात मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूरची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी भक्ती शक्ती मंगल कार्यालय, पीव्हीआर-खाडगांव रोड, लातूर येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. किशोर डाळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेने यंदाही सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. संचालक प्रा. व्ही. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
अध्यक्ष श्री. किशोर डाळे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करताना सांगितले की, संस्थेच्या लातूर, उस्मानाबाद, उमरगा व तडवळा येथे शाखा कार्यरत आहेत. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेचे ५,३४० सभासद असून वार्षिक उलाढाल ३१३.३१ कोटी रुपये झाली आहे.
संस्थेची आर्थिक स्थिती खालीलप्रमाणे आहे:
भागभांडवल: ₹५ कोटी २७ लाख ५२ हजार
ठेवी: ₹४२ कोटी ६३ लाख ६७ हजार
कर्ज वाटप: ₹२४ कोटी ३७ लाख ५६ हजार
एकूण उत्पन्न: ₹६ कोटी ७८ लाख ७१ हजार ४५८
निव्वळ नफा: ₹८९ लाख ३१ हजार २८७ (सर्व खर्च व तरतुदी वजा करून)
गुंतवणूक: ₹२८ कोटी १८ लाख ९२ हजार ९४०
स्वनिधी: ₹३ कोटी १२ लाख ६५ हजार ५०३
संस्थेने यंदाही सभासदांना १०% लाभांश जाहीर केला आहे. संस्था एक वर्षाच्या ठेवीवर ९% व्याज देत आहे. कर्जाच्या व्याजदराबाबत बोलताना अध्यक्षांनी सांगितले की, वाहन तारण, सोने तारण व पॉलिसी तारण कर्जासाठी ११%, इतर सर्व प्रकारच्या कर्जासाठी १३% आणि विनातारणी कर्जासाठी १६% व्याजदर आकारला जातो.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले द्वारकादास श्यामकुमार मराठवाडा ग्रुपचे संचालक श्री. तुकाराम पाटील म्हणाले, "ज्या संस्था पारदर्शक व नैतिकतेने कारभार करतात, त्या सर्व घटकांचा विश्वास संपादन करतात. प्रभात संस्था स्थापनेपासून लाभांश देते आणि दिवाळीत सवलतीच्या दरात साखर व तेल वाटप करून सभासदांचे हित जोपासते. अशा संस्था वाढल्या तरच सहकार टिकेल."
सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक श्री. एस. आर. नाईकवाडी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "कर्ज वसुली हा क्रेडिट सोसायटीचा आत्मा असतो. संचालक मंडळाने संस्थेतील थकबाकीचे प्रमाण नेहमी आटोक्यात ठेवावे व थकबाकी वाढू देऊ नये."
सभेत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एच. आर. खोसे यांनी विषयांचे वाचन केले, ज्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी उमरगा शाखेचे व्यवस्थापक श्री. विठ्ठल औरादे यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून ₹२१,०००/- चा पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सभेस संस्थापक चेअरमन डॉ. संजय वाघमारे, व्हाईस चेअरमन डॉ. डी. बी. मोरे, सेवानिवृत्त सहनिबंधक श्री. कुबेर शिंदे तसेच सभासद श्री. नारायण तुरूप सर यांनी मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक डॉ. संजय मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक ॲड. भागवत कदम यांनी मानले. या वार्षिक सभेला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.