मराठवाड्यात सहकार क्षेत्राला चालना: परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उद्घाटन

मराठवाड्यातील पतसंस्थांना संघटनात्मक बळ देण्याचा संकल्प - काका कोयटे यांचा विश्वास व्यक्त; सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक पतसंस्था उभारण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन
Parbhani District Cooperative Credit Society
परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उद्घाटन
Published on

परभणी: मराठवाड्यातील सहकारी पतसंस्था चळवळीला संघटनात्मक बळ देण्यासाठी परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची स्थापना करण्यात आली असून, या फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील पतसंस्थांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा (काका) कोयटे यांनी व्यक्त केला.

उद्घाटन सोहळा उत्साहात

परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते फेडरेशनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नवनियुक्त उपाध्यक्ष हरिकिशन शर्मा, संचालक विजय जोशी, डॉ. प्रकाश आकोशे, किरण चव्हाण, संग्राम सोनी, केदार गजमल, प्रदीप राठोड, सौ. स्वाती ठोंबरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Parbhani District Cooperative Credit Society
परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उद्घाटन

“मराठवाड्यात क्षमता प्रचंड”

मार्गदर्शन करताना काका कोयटे म्हणाले की, पश्चिम व उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यातील पतसंस्था चळवळ काहीशी मागे असली तरी येथे कार्यरत असलेल्या काही संस्था राज्याला दिशा देणारे कार्य करत आहेत. विशेषतः गोदावरी अर्बन सोसायटी आणि वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था या संस्थांनी राज्यातील पतसंस्था चळवळीला मार्गदर्शन करत संघटनात्मक बळ दिले आहे.

परभणी जिल्ह्यातील सक्षम व आदर्श पतसंस्थांना एकत्र आणून सर्व संस्थांची ‘मोट’ बांधणे अत्यावश्यक आहे. नव्याने स्थापन झालेल्या फेडरेशनच्या माध्यमातून संघटितपणे काम केल्यास जिल्ह्यातील चळवळीला नवे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रत्नदीप कळमकर यांच्या नेतृत्वावर विश्वास

फेडरेशनचे अध्यक्ष रत्नदीप कळमकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा फेडरेशन प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करत राज्य फेडरेशन परभणी जिल्हा फेडरेशनच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही काका कोयटे यांनी दिली. तसेच सर्व पतसंस्थांनी एकजूट दाखवून सहकार खात्यासमोर सकारात्मक व सक्षम प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

“कार्यक्षमता व पारदर्शकतेवर भर” – डॉ. शिंगी

राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, परभणी जिल्ह्यात पतसंस्थांची संख्या तुलनेने कमी असली तरी कार्यरत संस्था अधिक कार्यक्षम, पारदर्शक व सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. बंद पडलेल्या पतसंस्थांना पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य फेडरेशन महत्त्वाची भूमिका बजावेल.

त्यासाठी सर्व पतसंस्थांनी राज्य फेडरेशनचे सभासदत्व स्वीकारून संघटित ताकद वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.

“पतसंस्था म्हणजे हजारो कुटुंबांचा आधार”

प्रास्ताविकात परभणी जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष रत्नदीप कळमकर म्हणाले की, पतसंस्था ही केवळ आर्थिक संस्था नसून हजारो कुटुंबांचा आधार आहे. हा आधार अधिक भक्कम करण्यासाठी, येणारी आव्हाने पेलण्यासाठी आणि पतसंस्था चळवळ सुरक्षित, सक्षम व आधुनिक करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे.

फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या समस्या, अपेक्षा व विकासाच्या दिशा यावर एकत्रितपणे काम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला राज्य फेडरेशनचे संचालक सुदर्शन भालेराव, गोदावरी अर्बनचे कार्यकारी संचालक व राज्य फेडरेशन संचालक धनंजय तांबेकर, प्रसाद फलके, गिराम साहेब पाथरी, सुंदरलाल सावजी बँकेचे माजी अध्यक्ष प्रशांत सावजी कळमकर, श्री अष्टुरकर, दिलीप कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव लहाने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष अशोक सेलगांवकर व किशोर देशपांडे यांनी मानले.

Parbhani District Cooperative Credit Society
परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उद्घाटन

मराठवाड्यासाठी नवे अधिष्ठान

या उद्घाटन सोहळ्यामुळे परभणी जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या संघटनात्मक एकजुटीला नवे अधिष्ठान मिळाले आहे. मराठवाड्यातील पतसंस्था चळवळीला नव्या उमेदीने दिशा मिळेल आणि राज्यस्तरावर मजबूत प्रतिनिधित्व उभे राहील, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.

Banco News
www.banco.news