

पुणे : सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ देत, ग्राहक आणि सभासदांच्या अफाट विश्वासावर उभी राहिलेली ‘वनश्री नानासाहेब महाडीक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ईश्वरपूर’ या अग्रगण्य संस्थेने आता पुणे शहरात यशस्वी पाऊल ठेवले आहे. गुलटेकडी, पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात केंद्रीय सहकार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते संस्थेच्या नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातून सुरू झालेला हा प्रवास आज महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात पोहोचल्याने सहकार वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाडीक परिवाराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. ते म्हणाले,
"पुणे हे उद्योग, शिक्षण आणि आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे. अशा शहरात महाडीक मल्टीस्टेटने शाखा सुरू करणे ही संस्थेच्या प्रगतीमधील एक महत्त्वाची पायरी आहे. विश्वास, पारदर्शकता आणि सेवाभाव या त्रिसूत्रीवर आधारित ही वाटचाल संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी आदर्शवत आहे."
गुलटेकडी शाखेमुळे येथील उद्योजक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिक सक्षम व सुलभ आर्थिक सेवा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार महेश लांडगे, मल्टीस्टेट फेडरेशनचे चेअरमन सुरेश वाबळे, संस्थेचे संस्थापक श्री. राहुलदादा महाडीक आणि सांगली जिल्हा भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री. सम्राटबाबा महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकताना संस्थापक श्री. राहुलदादा महाडीक म्हणाले,
"ग्राहक आणि सभासदांनी दाखविलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. ईश्वरपूरपासून सुरू झालेला आमचा प्रवास आज पुण्यासारख्या महानगरापर्यंत पोहोचला आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. पुणे शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना अत्यंत पारदर्शक, तत्पर आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा आमचा कटाक्ष राहील. सहकाराच्या जोरावर सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी आणणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे."
यावेळी बोलताना श्री. सम्राटबाबा महाडीक यांनी सांगितले की,
"महाडीक परिवाराने नेहमीच सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पुणे शाखेच्या माध्यमातून आमच्या सेवाविस्ताराला एक नवी दिशा मिळाली आहे. पुणे आणि परिसरातील नागरिकांना उत्तम सेवा पुरवून हा विश्वास आणखी दृढ करण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत."
या सोहळ्यास संस्थेचे चेअरमन श्री. सतीशदादा महाडीक, व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप पाटील सर, व्यवस्थापक श्री. आर. एम. बागडी यांच्यासह कपिल ओसवाल, जयकर कदम, स्वरूपराव पाटील, आणि प्रसाद पाटील उपस्थित होते. तसेच, पुणे येथील ग्यानचंद रोहिरा, सतीश आफळे, उमेश दळवी, अनिल आरवडे, नवनाथ ऐनापुरे, नितीन कोतवाल, आशिष गोयल, अक्षय कथेड, रोहित लोढा, नितेश चांदुगडे, उमेश भाई शहा, रामशेठ लड्डा, विकास कचरे, राजाभाऊ रेवडे, अनिरुद्ध कुलकर्णी, सुनील वाल्हेकर आणि रोहन पिंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.