

संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या पगारदार नोकरांच्या पतसंस्थांच्या राज्य सहकारी फेडरेशनच्या संचालक मंडळाची महत्त्वाची सभा राज्याध्यक्ष श्री. संजय वामन शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या सभेत संस्थेच्या प्रशासकीय व धोरणात्मक कामकाजाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले तसेच नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. संजय शेवाळे यांनी सांगितले की, "आजमितीस राज्यात पगारदार पतसंस्थांची संख्या ५,८५३ एवढी आहे. यातील जवळपास ९५ टक्के पतसंस्था उत्तम आणि भक्कम स्थितीत कार्यरत आहेत. मात्र, उर्वरित ५ टक्के पतसंस्थांचा दर्जा उंचावून त्यांना पूर्ववत चांगल्या स्थितीत आणण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ कष्टाने व कसोशीने प्रयत्न करेल." यासोबतच अवसायनात (Liquidation) आलेल्या पगारदार पतसंस्थांना कायदेशीर मदत देऊन त्या पुनरुज्जीवित करण्याचे धोरणही सभेत निश्चित करण्यात आले.
सभेच्या अजेंड्यावरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी इंजि. विजय हिलाल मंगळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तहयात नियुक्ती करण्यात आली. उपस्थित सर्व संचालकांनी टाळ्यांच्या गजर करत या नियुक्तीचे जोरदार स्वागत व समर्थन केले.
संस्थेच्या धोरणात्मक व कायदेशीर कामकाजाला गती देण्यासाठी खालील तज्ज्ञ व सदस्यांची निवड करण्यात आली:
तज्ज्ञ संचालक: श्री. प्रकाश गोविंद आहेर (गिरणाडॅम, ता. नांदगाव) व श्री. दादासाहेब लाड (जि. कोल्हापूर)
स्वीकृत संचालक: श्री. विवेक नारायण मोरे (जि. नांदेड) व श्री. मसियुद्दीन सय्यद (जि. जालना)
कायम निमंत्रित सदस्य: श्री. पुरुषोत्तम मन्साराम इंगळे व श्री. कैलास चिंधा पगार
ज्येष्ठ मार्गदर्शक: श्री. विवेक जुगादे (नागपूर - महामंत्री, सहकार भारती महाराष्ट्र राज्य) व श्री. विनय खटावकर (पुणे)
बँकिंग व पत्रव्यवहार: बँकेच्या व्यवहारात सह्यांचे अधिकार तसेच अधिकृत पत्रव्यवहारासाठीच्या अधिकारांवर सविस्तर चर्चा करून एकमताने निर्णय घेण्यात आले. संस्थेचे नवे खाते बँक ऑफ महाराष्ट्र येथे उघडण्याचे निश्चित झाले.
संपर्क कार्यालये: सध्या धुळे येथे मुख्य कार्यालय तर पुणे येथे प्रशासकीय कार्यालय सुरू आहे. मात्र, राज्यभरातील सभासदांच्या सोयीसाठी गरजेनुसार इतर जिल्ह्यांमध्ये नवीन संपर्क कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोटनियम दुरुस्ती: वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या पोटनियम दुरुस्त्या तात्काळ मंजुरीसाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्याचे ठरले.
या सभेत नूतन संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांचा स्नेहपूर्वक सत्कार करण्यात आला:
उपाध्यक्ष: श्री. विजय वसंतराव देसले
सचिव: श्री. जगदीश मुरलीधर वाघ
संचालक: श्री. धनराज अभिमन पाटील, श्री. मनोज कारभारी वाघचौरे, श्री. विवेक नारायण मोरे, श्री. मसियुद्दीन सय्यद, श्री. कोकणी गणेश चुनिलाल.
विशेष सत्कार: नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि. विजय हिलाल मंगळे यांचा सत्कार अध्यक्ष श्री. संजय वामन शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
सभेचे यशस्वी आयोजन व सर्व विषयांवरील सकारात्मक चर्चेनंतर सचिव श्री. जगदीश मुरलीधर वाघ यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.