कोवाड मर्चंट सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात

सावकारी जाचातून मुक्ती देण्यात पतसंस्थांचे योगदान मोठे: महेश कदम
दि कोवाड मर्चंट ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था
दि कोवाड मर्चंट ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेचे श्री महेश कदम व उपस्थित मान्यवर
Published on

ग्रामीण भागात पतसंस्था चालवणे कठीण असले, तरी सर्वसामान्यांची सावकारी जाचातून मुक्ती करण्यात पतसंस्थांचे योगदान मोठे आहे. गुंतवणूकदारांनी भ्रामक जाहिरातींना भुलून आर्थिक संकटात येऊ नये," असे प्रतिपादन विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) महेश कदम यांनी केले. कोवाड (ता. चंदगड) येथे दि कोवाड मर्चंट ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

संचालक बी. के. पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष उत्तम मुळीक यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष दयानंद मोटुरे यांनी संस्थेच्या २५ वर्षांतील प्रगतीचा आढावा घेतला. श्री. गोटूरे म्हणाले की, "संस्थेस ३४ लाख २४ हजार नफा झाला असून सभासदांना १५% लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ९% दराने सोने-तारण कर्ज योजना व रौप्यमहोत्सवी ठेव योजना सुरु केलेली आहे.

सभेत प्रमुख वक्ते कॉ. प्राचार्य आनंद मेणसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश पवार, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर, एम. जे. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संस्थेचे मॅनेजर पी. पी. पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी सहायक निबंधक सुजय येजरे, लेखापरीक्षक सुरेश घाटगे, उपसरपंच रामचंद्र व्हन्याळकर, महादेव कांबळे, सुदाम पाटील, एम. व्ही. पाटील, अशोकराव देसाई, विक्रम चव्हाण-पाटील यांच्यासह आजी-माजी अध्यक्ष, संचालक, सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक बंडू तोगले यांनी आभार मानले.

Banco News
www.banco.news