
खापरखेडा (ता.सावनेर): स्वयमशक्ती क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, खापरखेडा संस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोराडी येथील सावजी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे मुख्य कार्यकरी अधिकारी सुनील गोमकाळे यांनी केले. सभेत संस्थेचे अध्यक्ष अनिल गोमकाळे यांनी पतसंस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला.
यामध्ये २०२४-२५ वर्षात संस्थेत २२ कोटी रूपयांच्या ठेवी वाढल्या आहेत. २१ कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ५२ कोटी रूपयांचा एकत्रित व्यवसाय झाला आहे. तसेच यावर्षी संस्थेला ४४ लाख ७१ हजार रूपयांचा नफा झाला असून संस्था जलद कर्ज वाटप करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणत आहे, अशी माहिती अध्यक्ष अनिल गोमकाळे यांनी दिली.
संपूर्ण नागपूर जिल्ह्यात संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारून नागपूर, पारशिवणी, मौदा व कामठी या तालुक्यात संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्याचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. तसेच या वर्षी सभासदांना विक्रमी १५ टक्के दराने लाभांश देण्याचे जाहीर केले. स्वयमशक्ती पतसंस्थेने महिलांसाठी लाडकी बहीण योजन सुरू करून त्यांना बचतीची सवय लावली आहे. या योजनेत ५ हजार खातेदार करायचे आणि संस्थेचा एकत्रित व्यवसाय १०० कोटी रूपयांचा करायचे उद्दिष्ट ठेवलेले आहे, असे पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल गोमकाळे म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना, संस्थेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, कर्जवसुलीची काटेकोर अंमलबजावणी तसेच ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीसाठी बचत व गुंतवणूक संस्काराची गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष राजेंद्रजी घाटे यांनी मार्गदशन केले.