काळभैरवनाथ पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न!

१३९ कोटींच्या ठेवी, २.०६% एनपीए आणि १० टक्के लाभांश; संस्थेचे अध्यक्ष श्री.भरतशेठ तुकाराम भोर यांच्या हस्ते नव्या बोधचिन्हाचे अनावरण
Kalbhairavnath Sahakari Patpedhi annual report 2025 2026
३५ व्या वार्षिक सभेत २४० कोटींच्या व्यवसायाचा आलेख सादर; २०० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट
Published on

मुंबई: काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादितची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (६ सप्टेंबर २०२६) घाटकोपर (पश्चिम) येथील श्री कच्छी कडवा पाटीदार ज्ञाति ट्रस्ट फंड सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष श्री. भरतशेठ तुकाराम भोर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.

सहकार क्षेत्रातील विश्वासाचा वारसा अधिक दृढ करत संस्थेने या वार्षिक सभेत आपल्या नवीन बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण केले. संस्थेच्या प्रगतीचा आलेख अधोरेखित करत सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

या सभेस संस्थापक अध्यक्ष सोपानकाका शिंदे, भिमाशंकर साखर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे, अवसरी खुर्दचे प्रशासक सरपंच प्रसाद कराळे, नवी मुंबई बँकेचे संचालक संतोष अभंग आणि मुंबईतील उद्योजक दत्ताशेठ बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण महादेव शिंदे, सचिव सौ. वर्षा किरण शिंदे, खजिनदार पांडुरंग गबाजी भोर, सर्व संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक सरव्यवस्थापक दत्तात्रय खोटे यांनी केले, तर सूत्रसंचालन योगेश वायळ यांनी केले.

संस्थेची आर्थिक घोडदौड (३१ मार्च २०२६ अखेर)

  • एकूण ठेवी: ₹१३९ कोटी ३२ लाख

  • कर्ज वाटप: ₹१०१ कोटी १९ लाख

  • खेळते भांडवल: ₹१५९ कोटी २९ लाख

  • संमिश्र व्यवसाय: ₹२४० कोटी ५१ लाख

  • भाग भांडवल: ₹४ कोटी ८१ लाख

  • निव्वळ नफा: ₹१ कोटी ६० लाख

  • निव्वळ एनपीए (NPA): २.०६%

  • घोषित लाभांश: १०%

सध्या घाटकोपर, तुर्भे, अवसरी खुर्द, चाकण, मंचर आणि उलवे येथे संस्थेच्या शाखा कार्यरत असून, येत्या काळात २०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे.

पतसंस्थेची आधुनिक ओळख दर्शवणाऱ्या नवीन बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण अध्यक्ष श्री.भरतशेठ तुकाराम भोर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच, संस्थेच्या गुणवंत पाल्यांचा विशेष गुणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात भरतशेठ भोर यांनी सभासदांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "सभासदांचा पाठंबा आणि विश्वास यावरच पतसंस्थेने सहकार क्षेत्रात आपले मानाचे स्थान निर्माण केले आहे. आगामी काळात संस्थेची आर्थिक व सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेत सभासदांनी मांडलेल्या विविध सूचना व मार्गदर्शनावर चर्चा करण्यात आली. सरतेशेवटी आभार प्रदर्शनाने ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता झाली.

Banco News
www.banco.news