कोपरगावच्या ज्योती सहकारी पतसंस्थेचा ६७४ कोटींचा व्यवसाय

लेखा परीक्षणात 'अ' वर्ग आणि ४.५० कोटींचा नफा आणि शून्य टक्के थकबाकी!
Jyoti Sahakari Patsanstha
Jyoti Sahakari Patsanstha
Published on

कोपरगाव: सहकार क्षेत्रात आपल्या चोख व्यवहारामुळे स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्योती सहकारी पतसंस्थेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मार्च २०२६ अखेर संस्थेचा एकूण एकत्रित व्यवसाय ६७४ कोटी रुपयांवर पोहोचला असून, संस्थेने ४ कोटी ५० लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. श्री. रविकाका बोरावके यांनी या यशाची अधिकृत माहिती प्रसिद्धीस दिली आहे.

ठेवी आणि कर्ज वितरणात मोठी वाढ

संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत असून, मागील वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये १३% वाढ होऊन त्या ४०६ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. तसेच कर्ज वितरणामध्ये १४% वाढ झाली असून एकूण २६८ कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली आहेत. संस्थेची एकूण गुंतवणूक १६४ कोटी रुपये झाली असून गुंतवणुकीमध्ये १६% वाढ नोंदवण्यात आली आहे. संस्थेचा सिडी रेशो ६६% इतका आहे.

एन.पी.ए. शून्य टक्के राखण्याची परंपरा कायम

ज्योती पतसंस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेने आपला नेट एन.पी.ए. (थकबाकी) ०.००% राखण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. यामुळे ठेवीदारांच्या मनात संस्थेबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या ठेवी १००% सुरक्षित असल्याची माहिती चेअरमन बोरावके यांनी दिली. कर्ज वसुलीसाठी काही कर्जदारांबाबत कठोर निर्णय घेतल्यामुळे वसुलीची स्थिती उत्तम राहिली आहे.

अग्रगण्य संस्था आणि सामाजिक भान

आपल्या ३८ वर्षांच्या प्रवासात संस्थेने सातत्याने प्रगती केली असून, सन २०२४-२५ या वर्षासाठी शासकीय लेखा परिक्षणात संस्थेला 'अ' वर्ग मिळाला आहे. चोख कारभारामुळे संस्थेला 'सर्वोत्तम पतसंस्था' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. केवळ बँकिंग क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक कार्यातही संस्था नेहमीच पुढाकार घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यशाचे मानकरी

संस्थेच्या या यशात सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. संस्थेचे व्यवस्थापक श्री. सुरेश शिंदे आणि असिस्टंट मॅनेजर श्री. सुनील क्षिरसागर यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीबद्दल आणि सहकार खात्याच्या नियमांच्या पालनाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Banco News
www.banco.news