९ वर्षांत १२० कोटींच्या ठेवींचा टप्पा; गुरुकृपा पतसंस्थेची गरुडभरारी!

पारदर्शक कारभार आणि सभासदांचा विश्वास हेच यशाचे गमक – संस्थापक महेंद्र लाड
Gurukrupa Pat Sanstha Kundal
गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ सभासदांचा गौरव; सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम
Published on

कुंडल : सहकारी संस्था चालवत असताना केवळ चहा-पानापुरती औपचारिकता न ठेवता कामकाजात १०० टक्के पारदर्शकता राखली पाहिजे. संस्थेच्या कारभारावर प्रत्येक सभासदाने जागरूक राहून प्रश्न विचारले पाहिजेत आणि सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून काम करणे हीच संचालक मंडळाची मुख्य जबाबदारी आहे, असे प्रतिपादन गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक महेंद्र लाड यांनी केले.

कुंडल (ता. पलूस) येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची ९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या सभेस सत्यविजय उद्योग समूहाचे प्रमुख बाळासाहेब पवार, सांगली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत लाड, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुंडलचे अध्यक्ष बाळासाहेब लाड, ज्येष्ठ नेते सर्जेराव पवार, युवा नेते रोहन लाड, सुरेश खारगे, मोहन लाड, योगेश लाड, पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gurukrupa Nagari Sahakari Pattsanstha
कुंडल येथील गुरुकृपा पतसंस्थेची ९ वी वार्षिक सभा उत्साहात. ९ वर्षांत १२० कोटींच्या ठेवी पार; ५ नवीन शाखांना मंजुरी - संस्थापक महेंद्र लाड.

१२० कोटींच्या ठेवी अन् ५ नवीन शाखांना मंजुरी

प्रगतीचा आलेख मांडताना महेंद्र लाड म्हणाले की, गेल्या ९ वर्षांच्या यशस्वी प्रवासात गुरुकृपा पतसंस्थेने सभासदांच्या सहकार्याने सुमारे १२० कोटी रुपयांच्या ठेवींचा पल्ला गाठला आहे. ठेवीदारांच्या ठेवींना पूर्ण सुरक्षितता देऊन त्यावर योग्य परतावा दिला जात आहे. रिझर्व्ह बँक आणि सहकार विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करत संस्थेने केवळ उत्पादक व परतफेडीची क्षमता असलेल्या कामांसाठीच कर्जवाटप करण्यावर भर दिला आहे. भावनेच्या आहारी जाऊन कर्जवाटप टाळणे आणि वेळेत वसुली करणे यामुळेच संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे.

तसेच, संस्थेच्या नवीन ५ शाखांना मंजुरी मिळाली असून मुख्य कार्यालयासह या शाखांचे फर्निचर व इतर तयारी वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आगामी काळात ऊस तारणावर कर्जवाटप योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. संस्थेच्या विकासात कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे असून त्यांना चांगला पगार, विमा आणि पीएफसारख्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

सामाजिक बांधिलकी आणि गुणवंतांचा सत्कार

संस्थेच्या सामाजिक उपक्रमांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मयत सभासदांच्या वारसांना आर्थिक साहाय्य, आकस्मिक वैद्यकीय मदत, मुलींच्या विवाहासाठी अर्थसाहाय्य आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज वेळेवर उपलब्ध करून दिले जात आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कर्ज घेऊन शेती बागायती करून व शेळीपालनाचा जोडधंदा उभारून वेळेत कर्जफेड करणाऱ्या एका कष्टकरी महिलेचा आदर्श प्रत्येक कर्जदाराने घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांचा आणि सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ सभासदांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे माजी अध्यक्ष बी. आर. पवार यांनी केले, तर प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप लाड यांनी केले. वार्षिक अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक वैभव सावंत यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले, तर आभार संचालक शिवाजी वरूडे यांनी मानले.

Banco News
www.banco.news