
कोल्हापूर: येथील गोकुळ संलग्न कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, शाहूपुरी येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी सभासदांना ८ टक्के लाभांश देणार असल्याचे जाहीर केले.
सभेत अध्यक्ष पाटील यांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना संस्थेचे वसूल भांडवल २६ कोटी २७ लाख, ठेवी ५७ कोटी ८० लाख, कर्ज वितरण ९२ कोटी ३ लाख, चालू नफा ३४ लाख १५ हजार तर संस्थेची वार्षिक उलाढाल १७२ कोटी ८१ लाख रुपये असल्याचे सांगितले. सभेत सभासदांसाठी ऐच्छिक विमा योजना व संस्थेच्या वतीने गोकुळ दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अहवाल वाचन सचिव संभाजी माळकर यांनी केले. यावेळी अहवालावर झालेल्या चर्चेत दीपक पाटील, मुकुंद पाटील, पी. आर. पाटील, संजय पाटील, सचिन मगदूम, सुनील पाटील आदींनी भाग घेतला होता. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग कापसे, संचालक जयदीप आमते, रामचंद्र पाटील, गोविंद पाटील, तुकाराम शिंगटे, सुनील वाडकर, संदेश भोपळे, सतीश पोवार, दत्तात्रय डवरी आदी उपस्थित होते. राजेंद्र चौगले यांनी आभार मानले.