
नांदेड येथील धनसंपदा महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा आठवा वर्धापनदिन तसेच संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. आनंद द्विगुणित करणा-या याप्रसंगी संस्थेचे संस्थापक तथा कार्यकारी संचालक श्री. रमेश राठोड सर, श्री. शिवकुमार मुंदडा, श्री. विनायक कदम, श्री. पालेपवाड सर, तसेच नांदेडचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. राजीव राठोड, प्राचार्य रावसाहेब जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी विविध शाखांमधील उत्कृष्ट कामगिरी करणा-या शाखा व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा निरुपा राठोड, उपाध्यक्ष ज्योती राठोड, संस्थेच्या सचिव नीता माळी तसेच संचालक मंडळातील सन्माननीय सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालनाची जबाबदारी उमरी शाखेचे श्री. उत्तम होनशेट्टे यांनी उत्तमरित्या पार पाडली. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले तर नवीन विविध ठराव एकमताने मंजुर करण्यात आले.
या दिमाखदार कार्यक्रमात, कार्यकारी संचालक श्री. रमेश राठोड यांनी संस्थेचा आजवरचा प्रवास उपस्थितांना सविस्तर सांगितला. संस्थेच्या अध्यक्षा निरुपा राठोड आणि संस्थेच्या सचिव मा. नीता माळी यांनी मान्यवरांसमोर मनोगत व्यक्त करताना संस्थेतर्फे सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच आगामी काळात संस्थेच्या कामकाजाची दिशा कशा पद्धतीची असेल, यासंबंधी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मुख्य शाखा व्यवस्थापक श्री. राजेश मुत्तेपवार यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. आज संस्थेमध्ये विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध असून त्यात सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज यांसारखे विविध कर्ज उपलब्ध आहेत. "धनसंपदा" ची अलीकडेच सुरु झालेली आणि लहान मुलांना बचतीचे महत्व शिकवणारी "बालबचत योजना" ही अल्पावधीतच कशी लोकप्रिय ठरली याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
काळानुरुप नवीन तंत्रज्ञानाचा वापर संस्थेत होत असून लवकरच संस्थेची स्वतःची वेबसाईटही येत आहे. जेणेकरुन ग्राहकांना अधिक चांगल्या आणि तत्पर सुविधा उपलब्ध होतील,असे सचिव नीता माळी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे समारोपपर भाषण हदगाव शाखा व्यवस्थापक श्री. प्रफुल राठोड यांनी केले व उपस्थितांप्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे आभार मानले.