राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड

सहकार क्षेत्राच्या नेतृत्वाची धुरा रत्नागिरीकडे: स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष आता संपूर्ण महाराष्ट्राच्या १९,००० पतसंस्थांचे नेतृत्व करणार!
Maharashtra Rajya Sahakari Patsanstha Federation - Deepak Patwardhan
रत्नागिरीचे ॲड. दीपक पटवर्धन राज्याच्या पतसंस्था फेडरेशनच्या सर्वोच्च पदावर विराजमान
Published on

मुंबई/रत्नागिरी: महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण पतसंस्था चळवळीची शिखर संस्था असलेल्या 'महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन'च्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादितचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. सध्याच्या जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक अस्थिरतेच्या काळात राज्यातील तब्बल १९ हजार पतसंस्थांचे नेतृत्व आता ॲड. पटवर्धन यांच्या अनुभवी हातांमध्ये सोपवण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण सहकार क्षेत्रातून आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ॲड. दीपक पटवर्धन यांच्या निवडीनंतर बोलताना भारतीय रिझर्व बँकेचे (RBI) संचालक सतीशजी मराठे यांनी या निवडीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले,

"सध्या जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि सातत्याने वाढणारे इंधनाचे दर यामुळे एकूणच आर्थिक विश्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या आर्थिक संकटाची झळ पतसंस्था क्षेत्रालाही बसत असून, त्यांच्यासमोर नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनला ॲड. दीपक पटवर्धन यांच्या रूपाने एक अत्यंत सक्षम, अभ्यासू आणि योग्य दिशा दाखवणारे नेतृत्व लाभले आहे."

या महत्त्वपूर्ण निवड प्रक्रियेवेळी सहकार क्षेत्रातील अनेक नामवंत आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये पतसंस्था फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक वसंतराव शिंदे, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शिंगी, महासचिव श्री. राजोबा सर, आणि ज्येष्ठ संचालक श्री. दादाराव तुपकर यांच्यासह राज्यभरातून आलेले फेडरेशनचे सर्व संचालक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वानुमते झालेल्या या निवडीमुळे फेडरेशनमधील एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

ॲड. दीपक पटवर्धन यांच्या या बिनविरोध आणि मानाच्या निवडीबद्दल महाराष्ट्राच्या राजकीय आणि सहकार वर्तुळातून जोरदार स्वागत होत आहे. यामध्ये प्रामुख्याने मा.ना. उदयजी सामंत (उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.आ. रविंद्रजी चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी), आमदार किरणजी सामंत, आमदार प्रवीणजी दरेकर (अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक), डॉ. उदयजी जोशी आणि आमदार प्रसादजी लाड या सर्व नेत्यांनी ॲड. पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळ अधिक मजबूत, पारदर्शक आणि प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Banco News
www.banco.news