
डिचोली (गोवा) येथील दीनदयाळ मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दीनदयाळ भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वल्लभ साळकर म्हणाले की, "आपल्या संस्थेस चालू आर्थिक वर्षात २ कोटी २५ लाख ५३ हजार रुपये निव्वळ नफा झाला. यावर्षी भागधारकांना आठ टक्के लाभांश घोषित केला आहे. सहकाराबरोबरच शिक्षण, आरोग्य, सामाजिक सेवा कार्यातही संस्था कार्यरत असून, भागधारक ठेवीदार ग्राहकांच्या भरीव पाठिंब्यावर संस्थेने मोठी मजल मारलेली आहे."
व्यासपीठावर उपाध्यक्ष कांता पाटणेकर, सचिव अर्जुन माळगावकर, सहसचिव अरुण नाईक, खजिनदार प्रदीप चणेकर, संचालक डॉ. राजेश केणी, श्याम मातोंडकर, डॉ. संदीप सावंत, विठ्ठल वेर्णेकर, शिवाजी जन्मी, डॉ. कशिश पाटणकर, सरगम चणेकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर पाटणेकर उपस्थित होते.
मधुकर पाटणेकर यांनी चालू आर्थिक वर्षाचा ताळेबंद भागधारकांसमोर मांडला. यावेळी भागधारकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्या शंकांचे निरसन पाटणेकर तसेच संचालकांनी केले. अनेकांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल, उपक्रमाबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.
गेली अनेक वर्षे ही संस्था उत्तम प्रगती साधत असून, त्यांची सामाजिक सेवा राज्यातील सहकार क्षेत्रात आदर्श असल्याचे यावेळी अनेकांनी मनोगतातून स्पष्ट केले. यावेळी विजय तेलंग, गिरीराज कोटीभास्कर, विजयकुमार नाटेकर, संजय ओझरकर व इतर भागधारकांनी विविध सूचना केल्या. अर्जुन माळगावकर यांनी सर्वांचे आभार मानले.