
सावंतवाडी: येथील दि कॅथोलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा ३२ वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा झाला. यानिमित्त प्रधान कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात रेव्ह. फा. मिलेट डिसोजा यांच्या प्रार्थनेने झाली. त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, संस्थेचे ग्राहक आणि सभासद यांच्या उपस्थितीत केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. पतसंस्थेने आपल्या ३२ वर्षांच्या प्रगतशील वाटचालीत ७ शाखांच्या माध्यमातून मोठी आर्थिक मजल मारली आहे. संस्थेने आज ४५० कोटींचा एकत्रित व्यवसायाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आनमारी जॉन डिसोजा यांनी संस्थेच्या यशाचे श्रेय सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांना दिले.
श्रीमती डिसोजा म्हणाल्या, "संस्थेला सातत्याने प्रगतीपथावर ठेवणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीमुळे आपल्या संस्थेला राज्य पातळीवरील 'महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन'कडून पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १३ ऑक्टोबर २०२५ रोजी गोकर्ण, महाबळेश्वर, कर्नाटक येथे आयोजित समारंभात होणार असून संस्थेसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.