

सभेची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच गेल्या वर्षभरात दिवंगत झालेल्या पतसंस्थेच्या सभासदांना आणि समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर सभेच्या औपचारिक कामकाजाला सुरुवात झाली.
सभेला पतसंस्थेच्या सर्व शाखा परिसरातील सभासद बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थिती लावली होती. सभेदरम्यान उपस्थित सभासदांनी संस्थेच्या कारभाराबाबत विचारलेल्या विविध शंका व प्रश्नांचे संस्थाध्यक्ष मा. किशोर महालक्ष्मे व संचालक मंडळाने अत्यंत सविस्तर आणि समाधानकारक निरसन केले. संचालक मंडळाच्या या पारदर्शक आणि तत्पर भूमिकेबद्दल उपस्थित सभासदांनी पतसंस्थेच्या सेवा-सुविधांवर पूर्ण समाधान व्यक्त करत संचालक मंडळावर पुन्हा एकदा ठाम विश्वास दर्शवला.
अध्यक्षीय समारोपीय भाषणात बोलताना पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. किशोर महालक्ष्मे म्हणाले की, भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्थेची पायाभरणी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व स्व. नारायणराव तामशेट्टीवार गुरुजी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकारी स्वयंसेवकांना सोबत घेऊन केली. परिपक्व वैचारिक अधिष्ठान, प्रामाणिकपणा आणि शिस्त यांच्या बळावर संस्थेने आजवरचा प्रवास केला आहे.
त्यांनी संस्थेच्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक कामगिरीची आकडेवारी मांडताना सांगितले की, संस्थेकडे सध्या २८१.७६ कोटी रुपयांच्या ठेवी असून २१९.२४ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. यासह संस्थेने ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे संस्थेचा निव्वळ एनपीए (Net NPA) 0% (शून्य टक्के) असून सभासदांना १४ टक्के लाभांश वितरीत केला जात आहे. हे सर्व भाग्यश्री पतसंस्थेने आपल्या पारदर्शक व्यवहारातून सिद्ध करून दाखवले आहे.
सद्यस्थितीत संस्थेच्या कार्यरत असलेल्या सर्व ७ शाखा स्वमालकीच्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत. संस्थेच्या या ३३ वर्षांच्या वाटचालीत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.
संस्थेच्या भावी विस्ताराबाबत बोलताना अध्यक्ष किशोर महालक्ष्मे यांनी प्रस्तावित नवीन ७ शाखांपैकी आगामी ३ शाखांच्या उद्घाटनाची निमंत्रणे उपस्थितांना दिली. यामध्ये १३ ऑगस्ट २०२६ रोजी लाखांदूर शाखा शुभारंभ, २४ ऑगस्ट २०२६ रोजी गोंडपिपरी शाखा नूतन इमारत वास्तूपूजन व उद्घाटन आणि ३० ऑगस्ट २०२६ रोजी गडचिरोली शाखा शुभारंभ सोहळ्याचा समावेश आहे.
सभासद, ग्राहक आणि शुभचिंतकांचा हा स्नेह आणि विश्वास असाच कायम राहावा, अशी सदिच्छा व्यक्त करत त्यांनी सर्वांना या सोहळ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. शेवटी सामूहिक 'पसायदानाने' सभेची अत्यंत मंगलमय वातावरणात सांगता झाली.