

सांगली: सहकार क्षेत्रात नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणार्या जोल्ले ग्रुप समूहाच्या श्री बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., एकसंबा (शाखा सांगली) संस्थेने पुन्हा एकदा आपल्या सभासदांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे. संस्थेच्या सांगली शाखेतील दिवंगत सभासद शीतल प्रकाश आंबरे यांच्या दुर्दैवी निधनानंतर, त्यांच्या वारसाला संस्थेच्या वतीने अपघाती मरणोत्तर निधीतून आर्थिक मदत करण्यात आली आहे.
दिवंगत शीतल आंबरे यांचे पती प्रकाश शांताराम आंबरे यांच्याकडे ७५ हजार रुपयांच्या मंजुरीचे पत्र नुकतेच सुपूर्द करण्यात आले. संस्थेचे क्रियाशील सभासद शिवपुत्र हालपन्नावर यांच्या हस्ते हे मदत पत्र प्रकाश आंबरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. या कठीण काळात संस्थेने दिलेल्या या आर्थिक आधारामुळे आंबरे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
संस्थेचे संस्थापक आणि माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, सहसंस्थापिका आमदार सौ. शशिकला जोल्ले आणि मुख्य शाखेच्या संचालक मंडळाच्या विशेष सहकार्य व मार्गदर्शनामुळे ही मदत प्रक्रिया अत्यंत जलद गतीने पार पडली. बिरेश्वर सोसायटी नेहमीच आपल्या सभासदांच्या सुख-दुःखात धावून जाणारी संस्था म्हणून ओळखली जाते, याचा पुनरुच्चार या प्रसंगी करण्यात आला.
या मदत पत्र वाटप प्रसंगी सांगली शाखेचे प्रतिष्ठित ठेवीदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दत्तात्रय अष्टेकर, चंद्रकांत पाटील, अमित पाटील, ईश्वर पटेल, संजय कोळी, अब्दुल मुल्ला, सिंधुताई गोवंडे, श्वेता गांधी तसेच शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप करताना सांगली शाखेचे व्यवस्थापक राजू खामकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि संस्था भविष्यातही सभासदांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.