आई भवानी महिला ग्रामीण पतसंस्थेला ‘सहकार प्रेरणा’ पुरस्कार

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सहकार मेळाव्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान
Aai Bhavani Mahila Patsanstha
कर्जत (रायगड) : सहकार प्रेरणा गौरव पुरस्कार स्वीकारताना आई भवानी महिला पतसंस्थेचे संचालक व कर्मचारी
Published on

सोनांबे (ता. ७): ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आई भवानी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला (सोनांबे) नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांच्या सहकारी फेडरेशनतर्फे देण्यात येणारा ‘सहकार प्रेरणा गौरव पतसंस्था पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

हा सन्मान रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित सहकार मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. एक ते सात कोटी रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या महिला पतसंस्था गटातून २०२४-२५ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेची निवड करण्यात आली.

शिस्तबद्ध आर्थिक व्यवहार आणि सदस्यकेंद्रित कामकाज

अल्पावधीतच विश्वासार्हता, पारदर्शकता आणि शिस्तबद्ध आर्थिक व्यवहार या गुणांमुळे संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. ग्रामीण महिलांना बचत, कर्जसुविधा, स्वयंरोजगार प्रोत्साहन आणि आर्थिक मार्गदर्शन देण्यावर संस्थेचा भर राहिला आहे.

सदस्यकेंद्रित विविध उपक्रम, वेळेवर कर्जवितरण, वसुलीतील शिस्त आणि आर्थिक नियोजन यामुळे संस्थेचे आर्थिक स्वास्थ्य सक्षम राहिले असून त्याचीच दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

पुरस्कार वितरण सोहळ्यास नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष भास्कर कोठावदे, कार्याध्यक्ष नारायणशेठ वाजे आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेच्या पदाधिकारी इंदूबाई पवार, कुसुम जोर्वे, मीरा पवार, रूपाली पवार तसेच व्यवस्थापक संजय पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श

आई भवानी पतसंस्थेने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. स्वयंरोजगार उपक्रमांना चालना, बचतीची सवय, आर्थिक साक्षरता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने घेतलेले उपक्रम यामुळे ही संस्था परिसरात आदर्श ठरत आहे.

या सन्मानामुळे संस्थेच्या कार्याला नवे बळ मिळणार असून आगामी काळात अधिक व्यापक पातळीवर महिलांसाठी उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.

Banco News
www.banco.news