यवतमाळ अर्बन बँकेची ६१ वी सर्वसाधारण वार्षिक सभा राळेगावात संपन्न..!

'नेट एनपीए' शून्य टक्क्यांवर तर बँकेला मिळाला 'अ' वर्ग दर्जा; सभासदांना लाभांश जाहीर.
Yavatmal Urban Bank dividend announcement 2026
सहकार क्षेत्रातील उत्तम कामगिरीचा गौरव; नियमित कर्ज परतफेडीचे अध्यक्षांचे आवाहन.
Published on

राळेगाव: संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या यवतमाळ अर्बन बँकेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ६ सप्टेंबर २०२६ रोजी राळेगाव येथील त्रिमुर्ती मंगलम येथे अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आर्थिक स्थैर्य जपणाऱ्या यवतमाळ अर्बन बँकेने यंदाही आपली प्रगतीची परंपरा कायम राखत शून्य टक्के 'नेट एन.पी.ए.'सह वैधानिक लेखापरीक्षणात 'अ' वर्ग दर्जा मिळवला आहे, ही माहिती या सभेत देण्यात आली.

सभेच्या औपचारिक कामकाजापूर्वी अमरावती येथील सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्राचार्य गजानन गवई यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. यानंतर बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे आणि उपस्थित संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेचा प्रारंभ झाला. अशोक कोल्हे व त्यांच्या संचाने सादर केलेल्या स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात राळेगाव परिसरातील सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्ती, गुणवंत विद्यार्थी, नियमित ठेवीदार व ग्राहकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक करताना बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला. बँक सातत्याने सभासदांच्या पाठीशी उभी राहत असल्याचे सांगतानाच, बँकेचे आर्थिक स्थैर्य मजबूत ठेवण्यासाठी ग्राहकांनी आपल्या कर्जाची परतफेड वेळेवर व नियमित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

बँकेने यंदा नेट एन.पी.ए. शून्य टक्के ठेवण्यात यश मिळवले असून, वैधानिक लेखापरीक्षकांनी बँकेला पुन्हा एकदा 'अ' वर्ग दर्जा दिला आहे, ही बाब सभासदांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, मागील आर्थिक वर्षात सभासदांना लाभांश जाहीर करण्यात आल्याची घोषणा अध्यक्षांनी करताच उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात समाधान व्यक्त केले.

सभेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे यांनी मागील वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सभेचे सूत्रसंचालन संचालक परिमल देशपांडे यांनी केले, तर राळेगाव शाखेचे व्यवस्थापक विकास वाघमारे यांनी आभार मानले.

या सभेला बँकेचे उपाध्यक्ष अजिंदरसिंह चावला, संचालक आशिष उत्तरवार, संजय डेहनकर, प्रमोद धुर्वे, ॲड. प्रफुल्लसिंह चौहान, गोवर्धन राठोड, परिमल देशपांडे, डॉ. महेश सारोळकर, वसंत सुपारे, संतोष पेन्शनवार, श्रीमंत मिराताई घाटे, तज्ज्ञ संचालक नरेंद्र देशपांडे, ॲड. संतोष कुचनकर, तसेच व्यवस्थापकीय मंडळ सदस्य अरविंद पांढारकर व सौरभ बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामूहिक 'वंदे मातरम'ने सभेची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राळेगाव शाखेतील सर्व कर्मचारी वृंदांनी विशेष परिश्रम घेतले.

Banco News
www.banco.news