नामको बँकेच्या अध्यक्षपदी विजय साने, उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती यांची बिनविरोध निवड

जालना मर्चंटस् बँकेचे यशस्वी विलीनीकरण; बँक पूर्णपणे डिजिटल करण्याचा नवनिर्वाचित अध्यक्षांचा संकल्प
NAMCO Bank Board Election Results
'नामको'ची घोडदौड कायम! अध्यक्षपदी विजय साने, तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती
Published on

नाशिक: उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर संस्था असलेल्या ‘दि नाशिक मर्चंटस् को-ऑपरेटिव्ह बँक लि.’ (नामको बँक) च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक श्री. विजय साने यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. प्रफुल्ल संचेती यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सातपूर येथील बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात पार पडलेल्या एका छोटेखानी व उत्साहपूर्ण समारंभात ही निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

निवडीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. विजय साने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "एक सामान्य कामगार ते मल्टिस्टेट शेड्यूल्ड बँक असलेल्या नामको बँकेचा चौथ्यांदा अध्यक्ष होणे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे," असे ते म्हणाले. बँकेच्या या यशामागे तळागाळातील कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

"सर्वसामान्य माणसाच्या दुःखात धावून जाणे आणि संवेदनशीलतेने काम करणे हेच आमचे कर्तव्य आहे. आगामी काळात बँकेचा व्यवसाय ५,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, शाखा विस्तार आणि स्वच्छ, पारदर्शक कारभारावर आमचा भर राहील," असे आश्वासन साने यांनी दिले.

NAMCO Bank Board Election Results
दि नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान.

'जालना मर्चंटस् बँक' नामकोमध्ये विलीन; डिजिटल बँकिंगवर भर

मावळते चेअरमन श्री. हेमंत धात्रक, सोहनलाल भंडारी आणि माजी आमदार वसंतभाऊ गिते यांनी आपल्या भाषणात बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. बँकेच्या सभासदांनी निवडणुकीत २१-० असा पूर्ण विश्वास दाखवल्याची आठवण त्यांनी करून दिली.

केंद्रीय सहकार मंत्री श्री. अमित शाह यांच्या पुढाकारामुळे देशातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळाल्याचे सांगतानाच, त्यांनी माहिती दिली की, देशात १४७२, महाराष्ट्रात ४४६ तर नाशिक जिल्ह्यात ४१ नागरी सहकारी बँका कार्यरत आहेत. एकीकडे प्रशासकीय काळात बँक विलीनीकरणाच्या छायेत असताना, नामको बँकेने आपल्या प्रगतीची घोडदौड कायम ठेवत 'मोतीराम अग्रवाल जालना मर्चंटस् को-ऑप बँक लि., जालना' या बँकेचे नामको बँकेत यशस्वी विलीनीकरण केले आहे. ही बाब अत्यंत कौतुकास्पद असून, येत्या काळात बँकेच्या एकूण शाखांचे उद्दिष्ट १०१ पर्यंत नेणे आणि अत्याधुनिक मोबाईल बँकिंग प्रणालीद्वारे बँकेचे पूर्ण डिजिटल रूपांतर करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, आमदार सीमाताई हिरे, माजी महापौर बाळासाहेब सानप, उपमहापौर विलास शिंदे, सुनिल केदार, अविनाश खैरनार, विजय काकड, सचालक सुभाष नहार, ललित मोदी, प्रशांत दिवे, अशोक आबा सोनजे, अ‍ॅड. आकाश छाजेड, प्रकाश दायमा, प्रफुल्ल संचेती आदींची बँकेचा गुणगौरव करणारी भाषणे झाली. याप्रसंगी देवेंद्र पटेल, महेंद्र बुरड, हरीष लोढा, अविनाश गोठी, रंजन ठाकरे, सौ. सपना बागमार, सौ. शितल भट्टड, तज्ञ संचालक मनोज पिंगळे, तज्ञ संचालक सम्यक सुराणा, मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी, बोर्ड सेक्रेटरी कल्पेश पारख, लक्ष्मण सावजी, अरूणकुमार मुनोत, नाना शिलेदार, महाराष्ट्र चेंबरचे सचिन शहा, सोनल दगडे, सचिन ठाकरे, अ‍ॅड. आनंद बागमार, उल्हास सातभाई, हरीभाऊ लोणारी, अभय छल्लाणी, अजिंक्य साने आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Banco News
www.banco.news