वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेची नोंदणी अखेर रद्द

स्मृती पाटील यांची कस्टोडियन म्हणून नियुक्ती
वसंतदादा शेतकरी सहकारी बँक
वसंतदादा शेतकरी सहकारी बँकवसंतदादा शेतकरी सहकारी बँक
Published on

येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या सहकारी कायद्यानुसार असलेल्या नोंदणीला अखेर रद्दबातल ठरवण्यात आले आहे. सहकार आयुक्त, पुणे यांच्या आदेशानुसार, बँकेच्या अंतिम दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी स्मृती पाटील यांची कस्टोडियन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या कार्यकाळानंतर बँकेचे अस्तित्व कायमचे संपुष्टात येणार आहे.

नोंदणी रद्दबाबतचा आदेश आठ दिवसांपूर्वीच झालेला असून, तो सहकार न्यायालयात सादर झाल्यानंतर ही माहिती उघडकीस आली. बँकेच्या १५ वर्षांच्या अवसायन कार्यकाळाची कालमर्यादा पार झाल्यामुळे नोंदणी रद्द करण्यात आल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केलेले आहे.

मात्र, या निर्णयाला काही राजकीय हालचालींमुळेही गती मिळाल्याची चर्चा आहे.

३५० कोटींचा गैरव्यवहार आणि बँकिंग परवाना रद्द:

२००९ च्या शासकीय लेखापरीक्षणात या बँकेत सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले. संचालकांनी संगनमत करून नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने २०१० मध्ये या बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला होता. त्यानंतर सहकार विभागाने बँकेवर अवसायक नियुक्त केला होता.

ठेवीदारांना परतावा, कर्जवसुली आणि विमा भरपाई:

ठेव विमा आणि हमी महामंडळाकडून मिळालेल्या १८९ कोटी रुपयांमधून अडीच लाखांच्या आतील ठेवी पूर्णपणे परत करण्यात आल्या. सध्या बँकेकडे १५५ कोटींच्या ठेवी असून, १६५ कोटी रुपयांची कर्जवसुली शिल्लक आहे. मोठ्या रकमेच्या कर्जदारांकडून वसुली प्रक्रिया सुरू आहे.

२७ संचालक आणि २ अधिकाऱ्यांवर ठपका:

२७ संचालक व २ अधिकारी यांनी मिळून बँकेचे १९५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याच्या वसुलीचे आदेश दिले असून महसूल वसुलीप्रमाणे त्यांची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

अवसायकांच्या कारभारावरही संशय:

अवसायकांच्या कारभारावरही अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत. बँकेच्या मालकीची २५ कोटी किंमतीच्या जागेची अवघ्या १० कोटींना विक्री, फर्निचर व इतर मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेत अपारदर्शकता, तसेच एका अवसायकाने सव्वा कोटींचे नुकसान केल्याचा ठपका यामुळे अवसायकांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Banco News
www.banco.news