
वसई विकास सहकारी बँक लि. ने आपल्या VVSB Mobi-Fast मोबाईल ॲपवर BillDesk ची “भारत कनेक्ट” बिल पेमेंट(मोबाईल ॲपवर BillDeskद्वारे विविध बिलांचे पेमेंट करणे) सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना सुरक्षित, सुलभ आणि अखंड डिजिटल बँकिंग सेवा देण्याच्या बांधिलकीला या उपक्रमाद्वारे बळकटी दिली आहे.
या नव्या सेवेच्या माध्यमातून बँकेचे ग्राहक आता वीज, क्रेडिट कार्ड, गॅस, पाणी, ब्रॉडबँड, डीटीएच, विमा हप्ता, मोबाईल रिचार्ज, कर्ज परतफेड तसेच महानगरपालिका कर यांसारख्या विविध बिलांचा भरणा थेट VVSB Mobi-Fast ॲपद्वारे करू शकतील. BillDesk “भारत कनेक्ट” द्वारे समर्थित ही सेवा वास्तविक वेळेत (तात्काळ) बिल प्रक्रिया, तत्काळ पावती आणि देशव्यापी सुविधा प्रदान करते.
या प्रसंगी वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन श्री.अशय राऊत यांनी सांगितले की, समाजसेवेच्या मूल्यांसह आधुनिक बँकिंग सेवा देण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेली ही बँक तंत्रज्ञानाचा अवलंब, ग्राहक सेवा आणि डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. BillDesk भारत कनेक्ट सेवेचा शुभारंभ हा बँकेच्या डिजिटल प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, ही सेवा ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व बिलांचा सुरक्षित, कार्यक्षम आणि नियमसंगत भरणा करण्याचे समाधान उपलब्ध करून देते. हा उपक्रम ग्राहकांना आणि समाजाला सर्वोत्तम डिजिटल बँकिंग सुविधा देण्याच्या बँकेच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिलीप वाय. ठाकूर यांनी या प्रसंगी सांगितले की, VVSB Mobi-Fast ॲपवर भारत कनेक्टचे एकत्रीकरण झाल्यामुळे ग्राहकांना कोणत्याही वेळी आणि कुठूनही सहज आणि विश्वासार्ह बिल पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सेवेने ग्राहकांची सोय वाढेल तसेच प्रत्यक्ष पेमेंट चॅनेलवरील अवलंबित्व कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बँकेचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी श्री.अशोक कुमार तिवारी यांनी सायबर सुरक्षा आणि नियामक अनुपालनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, आजच्या डिजिटल युगात ग्राहकांचा विश्वास हा सुरक्षेच्या भक्कम पायावर उभा असतो. भारत कनेक्टचे एकत्रीकरण करताना डेटा गोपनीयता, नियामक पालन आणि सुरक्षित व्यवहार प्रक्रिया यावर विशेष लक्ष दिले गेले आहे. ही सेवा सर्व नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करते आणि या शुभारंभातून बँकेची नवोन्मेषासोबतच सर्वोच्च सुरक्षेच्या मानकांबाबतची वचनबद्धता अधोरेखित होते.
या कार्यक्रमास BillDesk चे प्रतिनिधी श्री. इम्रान, श्री. रत्नेश, श्री. सचिन आणि श्री. सुमित तसेच बँकेचे संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, CISO, वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख आणि आयटी टीम उपस्थित होती.
ही नवीन सेवा वसई विकास सहकारी बँकेच्या डिजिटल नवोन्मेष, आर्थिक समावेशन, सायबरसुरक्षा आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक ठरली आहे.