वैभववाडीतील २२ विकास संस्थांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून भव्य गौरव!

संगणकीकरणामुळे विकास संस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते २२ संस्थांचा शानदार सत्कार!
Vaibhavwadi Vikas Seva Sanstha Satkar - Sindhudurg DCC Bank news
वैभववाडी तालुक्याने नियमित कर्ज परतफेडीचा आदर्श घालून दिला - संगणकीकरणामुळे विकास संस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता
Published on

वैभववाडी : विकास संस्थांना अधिक सक्षम करणे आणि त्यांचा कारभार पारदर्शक व गतिशील बनवणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. हे ओळखूनच केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी देशभरातील विकास संस्थांच्या व्यवहारांचे संगणकीकरण करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.

वैभववाडी येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हा बँकेच्या वतीने १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या तालुक्यातील २२ विकास सेवा सहकारी संस्थांच्या सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

१००% संगणकीकरण आणि पारदर्शकता: जिल्ह्यातील सर्व संस्थांना संगणक व सॉफ्टवेअर पुरवण्यात आले असून सचिवांच्या मेहनतीमुळे १०० टक्के संगणकीकरण पूर्ण झाले आहे. दररोजच्या 'डायनॅमिक डे' पद्धतीमुळे जमा, खर्च, कर्जवाटप आणि वसुलीची नोंद त्वरित जिल्हा बँक, सहकार विभाग, नाबार्ड, राज्य व केंद्र सरकारला दिसते. यामुळे व्यवहारात सुसूत्रता येऊन सभासदांचा विश्वास वाढला आहे.

मान्यताप्राप्त सचिवांची नेमणूक: सहकार कायद्यात २० वर्षांनंतर बदल करून 'मान्यताप्राप्त सचिव' ही संकल्पना आणली आहे. जिल्ह्यात ७२ सचिवांची नेमणूक झाली असून उर्वरित ७३ नेमणुका अंतिम टप्प्यात आहेत.

वैभववाडीचा आदर्श: पूर्वी नियमित कर्जफेडीत कुडाळ तालुका आघाडीवर होता, मात्र आता वैभववाडी तालुक्याने १०० टक्के वसुलीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

नियमित कर्जदारांना प्रोत्साहन देण्याची मागणी: कर्जमाफीपेक्षा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांऐवजी १ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान दिले पाहिजे आणि गावात त्यांचा जाहीर सत्कार झाला पाहिजे, अशी मागणी मनीष दळवी यांनी केली.

गौरव प्राप्त झालेल्या २२ विकास सेवा संस्था:

दिर्बादेवी तिथवली, केदारलिंग करूळ, अचिर्णे, आदिष्टी खांबाळे, केदारलिंग हेत, गांगेश्वर भुईबावडा, महालक्ष्मी कोकिसरे, शिवाजी तिरवडे, शंकर प्रासादिक नाधवडे, ग्रामसेवा सोनाळी, श्रीराम नावळे, कुंभजाई कुंभवडे, सिद्ध गांगेश्वर उपळे, गांगेश्वर गडमठ, रवळनाथ एडगाव, छत्रपती शिवाजी अरुळे, ओम आखवणे, ठाणेश्वर नापणे, गांगो लोरे, एकविरा नानिवडे, प्रकाश कुर्ली आणि रवळनाथ सडूरे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगावकर, दिलीप रावराणे, माजी संचालक दिगंबर पाटील, चेअरमन सौ. सीमा नानीवडेकर, सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे, संगणक प्रमुख हडकर, तालुका विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर आणि शाखा व्यवस्थापक सुरेश रावराणे यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banco News
www.banco.news