
त्रिपुरा राज्य सहकारी बँकेने (TSCB) आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी गोमती जिल्ह्यात मोहीम सुरु करताना, तेपानिया ब्लॉकच्या हद्रा ग्रामपंचायतीत विशेष शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात pmjjby, pmsby, अटल पेन्शन योजना यांसह प्रमुख सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नावनोंदणी, री-केवायसी औपचारिकता पूर्ण करणे यावर भर देण्यात आला. या शिबिराला स्थानिक नागरिक व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराला आरबीआयच्या ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक डॉ. नीना आर. जैन, वरिष्ठ आरबीआय अधिकारी आणि स्थानिक आमदार जितेंद्र मजुमदार यांनी भेट दिली. डॉ. जैन यांनी त्रिपुरा राज्य सहकारी बँकेच्या (टीएससीबी) सक्रिय उपक्रमाचे कौतुक करत, री-केवायसी, pmjdy खाती आणि सामाजिक सुरक्षा नोंदणीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच,आरबीआयच्या तक्रार निवारण यंत्रणेची माहिती देत नागरिकांना एकात्मिक लोकपाल योजना वापरण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार मजुमदार यांनी स्थानिक नागरिकांना विविध योजनांमध्ये नावनोंदणी करण्यास प्रोत्साहन दिले, तर आरबीआय अधिकाऱ्यांनी आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.ही मोहीम १ जुलैपासून सुरू झालेल्या तीन महिन्यांच्या राज्यव्यापी उपक्रमाचा भाग असून, एसएलबीसी संयोजक म्हणून पीएनबीकडून समन्वयित केली जात आहे आणि आरबीआय त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे.
त्रिपुरा राज्य सहकारी बँकेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण त्रिपुरामध्ये आर्थिक सक्षमीकरणात बँकेची भूमिका अधिक बळकट झालेली आहे.