
भारताच्या सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेने यूपीआय-आयसीडी (इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट) अधिग्रहण करणारी (UPI-आधारित रोख जमा / काढणे सेवा (ICD)) सेवा सुरु करून सहकारी बँकिंग इतिहासात नवा अध्याय रचला आहे. इतकेच नव्हे तर अशी सेवा पुरविणारी भारतातील पहिली बँक बनून टीजेएसबीने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. या उपक्रमामुळे बँकेने नावीन्यपूर्ण आणि ग्राहकाभिमुख तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये आघाडी घेतल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सुरू केलेल्या यूपीआय-आयसीडी फ्रेमवर्कमुळे ग्राहकांना कोणत्याही सहभागी बँकेच्या कॅश मशीनमध्ये साध्या यूपीआय क्यूआर कोडचा वापर करून रोख जमा करण्याची किंवा काढण्याची सुविधा मिळते. या प्रक्रियेसाठी डेबिट कार्ड किंवा विशिष्ट बँकेच्या पडताळणीची गरज नसते. यामुळे रोख सेवांमध्ये सोय, सुरक्षा आणि सर्वसमावेशक प्रवेश यांचा नवा युगारंभ झाला आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, टीजेएसबी बँकेचे पेर्टो अँड्रॉइड कॅश रीसायकलर मशीन हे एनपीसीआयद्वारे आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. हे प्रदर्शन ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झाले. या अभिनव मशीनद्वारे यूपीआय एटीएम आणि यूपीआय इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट सुविधा उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे कोणत्याही आयसीडी किंवा आयसीसीडब्ल्यू-सक्षम बँकेचे ग्राहक त्यांच्या आवडत्या यूपीआय ॲपचा वापर करून अखंडपणे रोख व्यवहार करू शकतात.
हा तांत्रिक नवोपक्रम डिजिटल आणि भौतिक रोख व्यवहार यांच्यातील दरी भरून काढतो. यामुळे कार्ड किंवा बँक-विशिष्ट एटीएमवरील अवलंबित्व कमी झाले असून ग्राहक आता केवळ क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढू किंवा जमा करू शकतात.
टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गंगल म्हणाले, “भारताचा पहिला यूपीआय-आयसीडी अधिग्रहणकर्ता होणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हा आमच्या नवोपक्रमशीलतेचा आणि सहकारी बँकिंग क्षेत्रातील आघाडी टिकवून ठेवण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”
तर टीजेएसबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर यांनी सांगितले, “ही उपलब्धी तांत्रिक प्रगती आणि ग्राहक-केंद्रित बँकिंगसाठीच्या आमच्या सततच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्ही यूपीआय-आयसीडी कार्यान्वित करून ग्राहकांना खरोखरच इंटरऑपरेबल कॅश सेवा देत आहोत.”
टीजेएसबी सहकारी बँक या उपक्रमाद्वारे भारताच्या डिजिटली सक्षम आर्थिक परिसंस्थेकडे सुरु असलेल्या वाटचालीला गती देत आहे, जिथे भौतिक आणि डिजिटल रोख व्यवहार अखंडपणे एकत्र येतात.
१९७२ मध्ये स्थापन झालेली टीजेएसबी सहकारी बँक ही भारतातील आघाडीच्या बहु-राज्यीय सहकारी बँकांपैकी एक आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये तिचे मजबूत जाळे असून, डिजिटल-प्रथम दृष्टिकोन, कार्यक्षमता आणि ग्राहकांचा विश्वास यावर बँकेची ओळख निर्माण झाली आहे. नवोपक्रम आणि उत्कृष्ट सेवेद्वारे टीजेएसबी बँक सहकारी बँकिंगचे नव-नवे मानदंड प्रस्थापित करत आहे.