
मुंबई: राज्यातील अनेक भागात वारंवार अतिवृष्टी झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आपल्या नफ्यातून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य्य देण्याची घोषणा बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या ११४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या प्रशासनाने केली. व त्याला उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला. या निधीचा धनादेश नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक श्री. विद्याधर अनास्कर यांनी दिली.
सहकारातील त्रिस्तरीय पतरचनेत शिखर बँक असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिल्हा बँकेच्या मदतीने शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करीत असते. दि. ३१ मार्च २०२५ अखेरीस आर्थिक वर्षात राज्य सहकारी बँकेने एकूण रु. १६,८९८ कोटी म्हणजे आपल्या एकूण कर्जाच्या ४७%कर्जवाटप शेतकऱ्यांना केलेले आहे. साखर उद्योगाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या एकूण कर्जाच्या २६% कर्ज पुरवठा केलेला आहे. म्हणजे जवळजवळ एकूण ७३% कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना राज्य सहकारी बँकेतर्फे होत असल्याने राज्य बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. नागपूर जिल्हा बँकेचा संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यावर तेथील शेतकऱ्यांना राज्य बँकेने दिलेल्या रु. १५५ कोटी टार्गेटपैकी रु. १५४ कोटी कर्ज वितरण केले आहे. राज्य बँकेच्या बोधचिन्हाच्या मध्यभागी शेतकऱ्याचे चित्र आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे हित ही मध्यवर्ती संकल्पना ठेऊन राज्य सहकारी बँकेने १० कोटींचा निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देत नैतिकतेच्या भूमिकेतून खारीचा वाटा उचलला आहे.
कंपनी कायद्याखाली स्थापन झालेल्या बँकांना व इतर कंपन्याना जसा CSR निधी (सीएसआर) असतो, तसा निधी सहकारी बँकांना उपलब्ध नसतो. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार त्यांना त्यांच्या गतवर्षीच्या निव्वळ नफ्याच्या केवळ १% निधी सामाजिक कार्यासाठी वापरता येतो. परंतु मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी ही मर्यादा गतवर्षीच्या नफ्याच्या २% इतकी आहे. राज्य सहकारी बँकेस सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात रु. ६५१ कोटींचा निव्वळ नफा झाल्याने रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार राज्य बँकेने जास्तीत जास्त म्हणजे रु. १० कोटींचा निधी दिला आहे. अशा प्रसंगासाठी रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा वाढवण्याची गरज आहे, असे श्री. अनास्कर म्हणाले.
सहकारी संस्थांना आवाहन:
सर्व सहकारी संस्थांनी राज्यातील शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधत आपल्या नफ्यातील जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचे आवाहन श्री. विद्याधर अनास्कर यांनी केले आहे.