सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड २०२५: मुदतपूर्व विमोचन तारखा जाहीर

या गुंतवणुकीवर मिळतो दुहेरी फायदा
सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड
सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड
Published on

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत मुदतपूर्व विमोचन (Premature Redemption) होऊ शकणाऱ्या सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्स (SGBs) च्या हप्त्यांचा (tranches) तपशील जाहीर केला आहे. जे गुंतवणूकदार मुदतपूर्तीपूर्वी आपली गुंतवणूक रोख रक्कमेत रूपांतरित करू इच्छितात, ते RBI ने जाहीर केलेल्या विशिष्ट कालावधीत अर्ज सादर करू शकतात.

सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड मध्ये गुंतवणूक केल्यास दुहेरी फायदा मिळतो – सोन्याच्या किमतीत वाढ तसेच दरवर्षी २.५% निश्चित व्याज, जे सहामाही स्वरूपात दिले जाते. बहुतांश गुंतवणूकदार दीर्घकालीन करमुक्त नफा मिळवण्यासाठी मुदतपूर्तीपर्यंत SGB धरून ठेवतात, तर काही जण तरलता (liquidity) आवश्यकतेसाठी मुदतपूर्व विमोचन पसंत करतात. प्रत्येक SGB योजनेचा कालावधी आठ वर्षांचा असतो, मात्र मुदतपूर्व विमोचन केवळ पाचव्या वर्षानंतरच, RBI ने जाहीर केलेल्या तारखांना करता येते.

विमोचन किंमत कशी ठरवली जाते?

विमोचन मूल्य (Redemption Price) भारत बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) यांनी प्रसिद्ध केलेल्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या मागील तीन कार्यदिवसांच्या बंद झालेल्या किमतींच्या साध्या सरासरीवर आधारित असते.

आता येथे जाणून घेऊया सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड (SGBs) म्हणजे काय? ते कोण जारी करतात?

सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड (SGB) हे भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक (RBI) जारी करते. हे बॉण्ड म्हणजे प्रत्यक्ष सोने धारण करण्याऐवजी सोन्याच्या ग्रॅममध्ये दर्शविलेले सरकारी रोखे (Government Securities) आहेत. गुंतवणूकदारांनी जारी किंमत रोख रकमेने भरायची असते आणि मुदतपूर्तीच्या वेळी विमोचनही रोख स्वरूपात केले जाते.

सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?

विदेशी चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (Foreign Exchange Management Act, 1999) अंतर्गत ‘भारतामध्ये राहणारे व्यक्ती’ (Persons Resident in India) SGB मध्ये गुंतवणूक करण्यास पात्र आहेत. पात्र गुंतवणूकदारांमध्ये –

* वैयक्तिक गुंतवणूकदार (Individuals)

* हिंदू अविभाजित कुटुंबे (HUFs)

* ट्रस्ट्स (Trusts)

* विद्यापीठे (Universities)

* धर्मादाय संस्था (Charitable Institutions)

समजा, एखाद्या वैयक्तिक गुंतवणूकदाराचा निवासी दर्जा (residential status) भारतामधील रहिवासी (Resident) वरून गैर-रहिवासी (Non-Resident) असा बदलला, तरी तो गुंतवणूकदार आपले SGB मुदतपूर्व विमोचन/मुदतपूर्तीपर्यंत ठेवू शकतो.
Banco News
www.banco.news