

नाशिक: श्री समर्थ सहकारी बँक, नाशिक यांच्या वतीने बँकेच्या सभासदांसाठी “सभासदांचे हक्क व कर्तव्ये-जबाबदारी” तसेच “सायबर सिक्युरिटी व डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता” या महत्त्वपूर्ण विषयांवर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सी.बी.एस., नाशिक येथील परशुराम भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात बँकेचे प्र. चेअरमन श्री. मनोज बाग, उपस्थित संचालक मंडळ आणि प्रमुख वक्ते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी बँकेचे प्र. चेअरमन श्री. मनोज अरुण बाग यांनी प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करत प्रमुख वक्त्यांचा सत्कार केला. संचालक श्री. मंदार तगारे यांनी प्रमुख वक्ते श्री. शरद जाधव यांचा, तर संचालक श्री. राजेंद्र खेडलेकर यांनी प्रमुख वक्ते श्री. शंतनु पाटील यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक श्री. मंदार ओलतीकर यांनी केले.
सभासदांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री मा. श्री. शरद जाधव यांनी “सभासदांचे हक्क व कर्तव्ये-जबाबदारी” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. बँकेच्या कार्यपद्धतीची माहिती मिळणे, हक्क व जबाबदाऱ्यांची जाणीव होणे आणि संस्थेच्या विविध योजनांची माहिती पोहोचवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणादरम्यान सभासदांचे अधिकार, संस्थेचे कामकाज, आर्थिक शिस्त, संस्थेच्या विकासात सभासदांची भूमिका आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बँकेच्या प्रगतीत सभासदांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सहकार भारती नाशिक ग्रामीणचे महामंत्री मा. श्री. शंतनू पाटील यांनी ‘सायबर सिक्युरिटी व डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता’ या विषयावर मार्गदर्शन करताना वाढते सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, बनावट मेसेज व कॉल्स, फिशिंग लिंक्स आणि सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली.
UPI, मोबाईल बँकिंग आणि डिजिटल व्यवहार करताना OTP, पासवर्ड, PIN, CVV किंवा बँक खात्याची कोणतीही माहिती कोणासोबतही शेअर करू नये, तसेच अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नये, असे आवाहन त्यांनी केले. फसवणूक झाल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून तातडीने तक्रार नोंदवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. या प्रशिक्षणामुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षितपणे करण्यास मदत होईल, असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी बँकेच्या संचालक सौ. दीप्ती पंडित यांनी उपस्थित मान्यवर व सभासदांचे आभार मानले.
या कार्यक्रमास बँकेचे संचालक श्री. मंदार ओलतीकर, श्री. पुष्कर पाराशरे, श्री. मंदार तगारे, श्री. राजेंद्र खेडलेकर, सौ. दीप्ती पंडित, माजी संचालक श्री. बाळकृष्ण कुलकर्णी, श्री. नरेंद्र कुलकर्णी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रकाश चितोडकर यांच्यासह बँकेचे मान्यवर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.