
महाराष्ट्रातील अग्रगण्य शेडूल्ड बँक "शिक्षक सहकारी बँकेने" आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९.१७ कोटी रुपयांचा शुद्ध नफा मिळवला असून बँकेचा नेट एन.पी.ए. शून्य टक्के आहे. बँकेने आपली वाटचाल उत्तम राखत यंदाही ऑडिट वर्ग 'अ' प्राप्त केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार श्री. अनिल सोले यांनी बँकेच्या नागपूर येथील कार्यालयात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
बँकेने आर्थिक वर्षात १९२१ कोटींहून अधिक व्यवसायाचा केलेला आहे. एकूण ठेवी ११९० कोटीपेक्षा जास्त असून कर्ज वाटप ७३१ कोटी रुपयांचे झालेले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मानकानुसार हवा असलेला किमान १२ टक्के सीआरएआर बँकेने यावर्षी १६ टक्क्यांवर नेलेला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये शुद्ध नफ्यात वाढ झाल्याने २ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. शिक्षक सहकारी बँकेने आपल्या सभासदांना आर्थिक सेवा देण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे.
श्री.अनिल सोले म्हणाले की, "सहकार क्षेत्रातील बदलते धोरण लक्षात घेता बँकेने आपल्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. बँकेच्या मोबाईल बँकिंग आदी सुविधांमुळे ग्राहकांना अधिक सुलभ सेवा मिळत आहेत." सभेत बँकेच्या भावी योजना आणि विस्ताराबाबतही माहिती देण्यात आली. विविध शाखांमधून आणि सदस्यांकडून आलेल्या सूचनांचा अभ्यास करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी आमदार श्री. नागो गाणार, बँकेचे महाव्यवस्थापक सुधाकर नखाते यांचा सत्कार करण्यात आला.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे संचालन बँकेचे संचालक विवेक जुगादे यांनी तर अहवाल वाचन संचालक योगेश बन यांनी केले. संचालक सुनील पाटील यांनी श्रद्धांजली वाहायच्या नावांचे वाचन केले व उपस्थितांनी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
या सर्वसाधारण सभेला संचालक अनिल मुळे, भोलानाथ सहारे, रंजीव श्रीरामवार, तुलाराम मेश्राम, कल्पना पांडे, मनीषा वाकोडे, विनायक राजकारणे, रवींद्र येणुरकर, आशिष वांदिले, सतीश यादव, वंदना कोथळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अल्पेशकुमार जोशी, मंडळातील सदस्य, कर्मचारी व विविध समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.