

नांदेड : बँकिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता नांदेडच्या सहकार क्षेत्रातील अग्रेसर संस्था असलेल्या ‘शंकर नागरी सहकारी बँक लि., नांदेड’ यांनी आपल्या ग्राहकसेवेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गणेशोत्सव व श्री महालक्ष्मी सणाचे औचित्य साधून बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या आय.एम.पी.एस. (IMPS), यु.पी.आय. (UPI), फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay) व मोबाईल बँकिंग (Mobile Banking) सुविधांचा अत्यंत थाटात शुभारंभ केला.
या अत्याधुनिक डिजीटल बँकिंग सेवांचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष मा. आमदार श्री. ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सध्याच्या धावपळीच्या आणि डिजीटल युगात ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हीच गरज ओळखून शंकर नागरी बँकेने आपल्या लोकोपयोगी सोयी-सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा व वाढ करण्याचे धोरण अवलंबले आहे. गणेश चतुर्थी व महालक्ष्मी पूजनाच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेली ही डिजीटल सेवा बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.
या नव्या सेवेमुळे शंकर नागरी बँकेचे ग्राहक आता अवघ्या एका क्लिकवर कोणत्याही बँकेशी आर्थिक व्यवहारांची (पैशांची देवाण-घेवाण) सुरक्षित व सुलभ पद्धतीने देवाण-घेवाण करू शकणार आहेत.
बँकेचे सी.ई.ओ./एम.डी. श्री. विक्रम राजे यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की, "बँकेने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी खास या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या डिजीटल सेवांमुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार असून बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होतील. बँकेच्या सर्व सन्माननीय ग्राहकांनी या अत्याधुनिक सेवांचा अवश्य लाभ घ्यावा," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या दिमाखदार शुभारंभाच्या प्रसंगी बँकेच्या संचालक मंडळासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये मा. श्री. भास्कररावजी तरोडेकर (संचालक), मा. श्री. सदाशिवराव देशमुख (संचालक), मा. श्री. मनोजराज भंडारी (संचालक), श्री. नंदकुमार भोळे (सहाय्यक सरव्यवस्थापक), श्री. सचिन कोरे (आय.टी. व्यवस्थापक) यांच्यासह बँकेचा संपूर्ण कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. बँकेच्या या नवीन उपक्रमामुळे नांदेड परिसरातील ग्राहक व भागधारकांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे.