ग्लोबल फायनान्स अवॉर्ड्समध्ये स्टेट बँकेचा जागतिक स्तरावर विजय

ग्लोबल फायनान्स अवॉर्ड्समध्ये एसबीआयचा जागतिक सन्मान चेअरमन सेट्टी म्हणाले, “दररोज ६५,००० नवे ग्राहक जोडले जातात; ही आमच्यावरच्या जनतेच्या विश्वासाची साक्ष आहे.”
स्टेट बँक ऑफ इंडिया
एसबीआयचे चेअरमन श्री एस.सेट्टी सन्मान स्वीकारताना
Published on

मुंबई / न्यूयॉर्क — भारताची सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला ग्लोबल फायनान्स अवॉर्ड्स मध्ये ‘वर्ल्ड्स बेस्ट कन्झ्युमर बँक’ म्हणून गौरविण्यात आले आहे. हा सन्मान केवळ भारतातील सर्वोत्तम बँक म्हणूनच नव्हे, तर जागतिक स्तरावर पहिल्यांदाच विजेता म्हणून एसबीआयने मिळवला आहे.

पुरस्कार स्वीकारताना एस बीआय चे चेअरमन श्री एस.सेट्टी यांनी सांगितले की, “ही केवळ आमच्या टीमच्या मेहनतीची दखल नाही, तर भारतातील ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाची साक्ष आहे. आमच्याकडे सध्या ५२० दशलक्ष (५२ कोटी) ग्राहक आहेत आणि दररोज सुमारे ६५,००० नवे ग्राहक जोडले जातात.”

त्यांनी पुढे सांगितले की, “एसबीआय ही डिजिटल-फर्स्ट आणि ग्राहक-फर्स्ट बँक आहे. आम्ही तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आमचे फ्लॅगशिप मोबाईल ऍप जवळपास १० कोटी ग्राहक वापरतात, ज्यापैकी दररोज १० लाख ग्राहक लॉग इन करतात.”

कार्यक्रमात सूत्रसंचालकाने एसबीआयच्या व्यापक नेटवर्कचा आणि ५० कोटींपेक्षा जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेचा उल्लेख करत, “ही बँक जगातील सर्वाधिक गतिशील बाजारपेठांपैकी एकामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे,” असे गौरवोद्गार काढले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सेट्टी यांनी विनोदी शैलीत सांगितले, “ग्लोबल फायनान्सचे आभार, आणि एक छोटी दुरुस्ती — आमच्याकडे ५० कोटी नव्हे, तर ५२ कोटी ग्राहक आहेत!”

कार्यक्रमाचा शेवट टाळ्यांच्या गडगडाटात झाला, आणि सेट्टी यांनी आश्वासन दिलं, “आमचं वचन आहे — आम्ही सर्वोत्तम ग्राहक-केंद्रित बँक म्हणून कार्य करत राहू, आणि लवकरच जगातील सर्वोत्तम बँक म्हणूनही ओळखले जाऊ.”

Banco News
www.banco.news