सतीश मराठे यांची नाबार्डच्या संचालकपदी निवड

बँकिंग, सहकार, ग्रामविकास क्षेत्रातील अनुभवाचा गौरव
श्री.सतीशजी मराठे
श्री.सतीशजी मराठे
Published on

बँको वृत्तसेवा: "सहकार भारती" चे संस्थापक सदस्य, रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री. सतीशजी मराठे यांची नुकतीच केंद्र सरकारने (अर्थ मंत्रालय) नाबार्डच्या (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) संचालकपदी नियुक्ती केली आहे. देशाचा आर्थिक विकास साधत असताना सहकार क्षेत्रात सर्वसामान्यांचा सहभाग वाढवून हा विकास तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी नुकतेच सरकारने नवे सहकार धोरण जाहीर केलेले आहे. या धोरणात सहकार क्षेत्राच्या वाढीकरिता विविध तरतुदी केलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर श्री. मराठे यांची नाबार्डच्या संचालक पदावर सरकारने निवड केल्यामुळे सरकारने एकप्रकारे श्री. मराठे यांच्या बँकिंग, सहकार, ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा गौरव केलेला आहे.

श्री.सतीश मराठे सध्या रिझर्व्ह बँकआणि नॅशनल हाउसिंग बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि अभ्यासपूर्ण भूमिका यामुळे ते ओळखले जातात. 'नाबार्ड' सारख्या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्थेच्या संचालक मंडळात त्यांच्या समावेशामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषिविकास आणि सहकार चळवळीस नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल सहकार क्षेत्रात कार्यरत विविध मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलेले आहे. सहकार क्षेत्राच्या भरभराटीला त्यांचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशा प्रतिक्रिया सहकार तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.

Banco News
www.banco.news